सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
प्रभाग क्रमांक ४ मधून सी. ए. सुशिल बदपट्टे यांचा झंजावाती प्रचार; ‘शब्द दिला की पूर्ण करणार’
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सी. ए. सुशिल बदपट्टे यांनी आपल्या प्रचाराची झंजावाती सुरुवात केली आहे. “शहराच्या प्रगतीचे घड्याळ आता नव्या वर्षात अधिक जोमाने आणि अचूक वेळेसह धावायला लागेल,” असा विश्वास व्यक्त करत बदपट्टे यांनी विकासकेंद्री राजकारणावर भर देण्याची ग्वाही दिली.
प्रचाराच्या प्रारंभीच बदपट्टे यांनी मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडली. “मी खोटे आश्वासन देणार नाही. एकदा शब्द दिला की तो पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले. त्यांच्या या भूमिकेला प्रभागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
सी. ए. सुशिल बदपट्टे हे चार्टर्ड अकाउंटंट असल्याने आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि नियोजनबद्ध विकास हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, नागरी सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“महापालिकेतील प्रत्येक रुपयाचा उपयोग नागरिकांच्या हितासाठीच झाला पाहिजे. नियोजन, वेळेचे पालन आणि प्रामाणिक अंमलबजावणी यावर माझा भर राहील,” असेही बदपट्टे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ४ चे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ.सारीका फुटाणे, सौ.कविता चंदनशिवे व विश्वनाथ बिडवे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, विवेक फुटाणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चौकट
प्रभाग क्रमांक ४ मध्ये चुरशीची लढत
प्रभाग क्रमांक ४ मध्ये विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मात्र बदपट्टे यांच्या प्रचारातील आक्रमकता, स्पष्ट भूमिका आणि विकासाचा अजेंडा यामुळे या प्रभागातील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, विश्वासार्ह आणि उत्तरदायी नेतृत्वाची गरज असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त होत असून, येत्या काळात प्रचाराचा वेग आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
.jpg)
0 Comments