अवकाळी पावसातच कळंब बसस्थानक जलमय! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

अवकाळी पावसातच कळंब बसस्थानक जलमय!

 अवकाळी पावसातच कळंब बसस्थानक जलमय!



जागोजागी खड्डे; प्रवाशांच्या जीवितास धोका — प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
कळंब (कटूसत्य वृत्त):- अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीत कळंब येथील बसस्थानकाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली. संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने स्थानक अक्षरशः तुंबले असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
बसस्थानक परिसरात डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे हे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. वाहनचालकांनाही बस वळवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिक नागरिक व आस्थापनाधारकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. मात्र, “लवकरच दुरुस्ती करू” या आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी उन्हाळ्यात धुळीचा त्रास आणि पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्याचा त्रास असा दुहेरी फटका व्यापारी व प्रवासी सहन करत आहेत.
विशेष म्हणजे, कळंब हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून दररोज शेकडो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. तरीही मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तात्काळ खड्डे बुजवून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages