सोलापूरच्या विकासात अजित पवारांचा मोलाचा वाटा; ५० कोटींचा निधी मंजूर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या औद्योगिक, कृषी, सहकार, आरोग्य व शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीमुळेच ३२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे शक्य झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण शहरवासियांना झाली आहे. होटगी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास मर्यादा असल्याने बोरामणी विमानतळाच्या विकासाची मागणी सोलापूरकरांकडून सातत्याने होत होती. यासाठी विविध आंदोलनही झाली होती.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळासाठी भरीव निधी मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांनी भूसंपादनासाठी ५० कोटी रुपयांची मागणी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत अजित पवार यांनी काही मिनिटांतच ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
या निधीतून शेतकऱ्यांकडील ३२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले. निधी मंजूर झाल्यानंतर अजित पवार यांनी विमानतळ विकासाच्या कामाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेतला. रात्रंदिवस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामाचा तपशील मागवला जात होता.
दरम्यान, वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीच्या भूसंपादनामुळे विमानतळ विकासाचे काम रखडले. ही जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या ताब्यात मिळावी, यासाठी अजित पवार यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने हा पाठपुरावा आता कमी पडेल, अशी भावना सोलापूरकरांमधून व्यक्त होत आहे.
0 Comments