Hot Posts

6/recent/ticker-posts

कामाचा माणूस गेला”- करमाळ्यात आठवतोय अजित पवारांचा दौरा

 कामाचा माणूस गेला”- करमाळ्यात आठवतोय अजित पवारांचा दौरा




करमाळा (कटूसत्य वृत्त):- गेल्या वर्षी सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा तालुक्याचा दौरा केला होता. कोटी व संगोबा या गावांमध्ये पुराचे पाणी व चिखलातून वाट काढत त्यांनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला होता व मदतीचे आश्वासन दिले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा हा करमाळा दौरा पुन्हा एकदा नागरिकांच्या आठवणीत आला असून, ‘कामाचा माणूस गेला’ अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. बारामती येथे विमान अपघातात पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या अनपेक्षित घटनेने करमाळा तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अजित पवार आणि करमाळा तालुक्याचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. तालुक्यातील विविध राजकीय गटनेत्यांचा त्यांच्याशी थेट संपर्क होता. त्यांच्या निधनानंतर २४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेला करमाळा दौरा विशेष चर्चेत आला आहे.

त्या दौऱ्यात पवार यांनी कोटी गावात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली होती. त्यानंतर संगोबा येथे सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी करत, साचलेल्या पाण्यातून चालत जाऊन शेतीची परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. संगोबा येथील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा महत्त्वाच्या भागांशी संपर्क तुटतो, अशी माहिती त्यांना देण्यात आली होती. वरील भागातून १७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पूल पाण्याखाली गेला होता.

यावेळी अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. भविष्यात २० ते २५ हजार क्युसेक पाणी सोडले तरी ते पुलाखालून सुरक्षितपणे जावे, अशा प्रकारे पूल उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पुलाच्या कामासाठी आवश्यक निधी कोणत्या योजनेतून द्यायचा, ते आपण ठरवू, असे सांगत भूम, परांडा व करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मागणीची दखल घेतली होती. उद्या ढगफुटी झाली तरी नागरिकांना त्रास होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

या दौऱ्यात पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता. नागरिकांनी पुलाची मागणी मांडताच त्यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून करमाळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments