माढा-करमाळा: अजित पवार यांच्या निधनाने जनतेत हळहळ
माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा माढा-करमाळा तालुक्यांचे लाडके नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी कळताच माढा आणि करमाळा तालुक्यांतील जनतेला मोठा धक्का बसला. “अजितदादा आता आपल्यात नाहीत” हे शब्द कानावर पडताच अनेक क्षणभर सुन्न झाले. विकासाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अजितदादांच्या जाण्याने दोन्ही तालुके शोकमग्न झाले आहेत.
विमान अपघातातील निधनाची बातमी समजताच सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसत नव्हता. मात्र, ही बातमी खरी ठरताच माढा व करमाळा तालुक्यांच्या विकासासाठी अजितदादांनी घेतलेले निर्णय, उचललेली पावले आणि दिलेली आश्वासने नागरिकांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. कुर्डुवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी बारामतीचा निधी उपलब्ध करून दिल्याची आठवण अनेकांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
माढा आणि करमाळा तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार बबनराव शिंदे व संजय शिंदे यांचे अजितदादांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांनी तालुक्याच्या विकासासंदर्भातील प्रश्न अजितदादांसमोर मांडले की, त्यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून ते प्रश्न मार्गी लावले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आर्थिक जीवनवाहिनी मानली जाते. बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर तिची सूत्रे प्रशासकांच्या ताब्यात गेली होती. परिस्थिती सावरत असतानाच निवडणुकीचा प्रश्न न्यायालयात गेला. ही बाब माजी आमदार संजय शिंदे यांनी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार यांच्याशी चर्चा केली. न्यायालयात गेलेल्यांना फोन करून प्रकरण मागे घेण्यास सांगण्यात आले आणि बँकेला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाली. हा निर्णय आजही शेतकरी वर्ग कृतज्ञतेने आठवतो.
गेल्या कार्यकाळात एकट्या करमाळा तालुक्यासाठी सुमारे ३४०० कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात अजित पवार यांची निर्णायक भूमिका होती. कुर्डुवाडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना आर्थिक मर्यादा निर्माण झाल्या होत्या. त्या कठीण प्रसंगी अजितदादांनी बारामतीसाठीचा निधी थांबवून तो थेट कुर्डुवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करून दिला. हा निर्णय त्यांच्या विकासात्मक प्राधान्यक्रमाचे ठळक उदाहरण ठरला.
माढा व करमाळा तालुक्यांतील वीज समस्या असो वा पायाभूत सुविधांचे प्रश्न, प्रत्येक बाबतीत त्यांनी शिंदे बंधूंच्या आग्रहाला मान देत सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे या भागातील जनतेने त्यांना केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर आपला हक्काचा माणूस म्हणून पाहिले. त्यांच्या निधनाने हा आपला माणूस गमावल्याची भावना आज दोन्ही तालुक्यांतून व्यक्त होत आहे.
0 Comments