Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या इंद्रभुवनशी जोडलेली अजित पवारांची आठवण

 सोलापूरच्या इंद्रभुवनशी जोडलेली अजित पवारांची आठवण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. विकासकामांचा बारकाईने आढावा घेताना त्यांनी दाखवलेली दृष्टी, ऐतिहासिक वारशाविषयीची आपुलकी आणि स्पष्ट सूचना आजही महापालिका प्रशासनात स्मरणात आहेत.

शनिवार, दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेला भेट दिली होती. यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी त्यांचे स्वागत केले. इंद्रभुवन इमारतीतील मीटिंग हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. स्क्रीनवर सुरू असलेली सादरीकरणे त्यांनी लक्षपूर्वक पाहिली. प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारत, आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर अजित पवार यांनी सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या इंद्रभुवन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी  केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नूतनीकरणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.मूळ वास्तुशैलीला कोणताही धक्का बसू नये, याबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. काही ठिकाणी आढळलेल्या लहानसहान त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

इंद्रभुवनच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले होते, “इंद्रभुवन ही केवळ इमारत नसून सोलापूरचा इतिहास आहे.” नूतनीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत महापालिकेच्या कार्याचे कौतुक केले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा लाभलेली सोलापूर महापालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

आजही इंद्रभुवनच्या दगडी भिंती, कमानी आणि ऐतिहासिक रचनेतून ‘मूळ सौंदर्य जपा’ असा अजित पवार यांचा संदेश आठवणींच्या रूपाने उमटताना दिसतो. त्यांच्या त्या भेटीने इंद्रभुवनच्या इतिहासात एक महत्त्वाचा क्षण नोंदवला गेला असून, तो सोलापूरकरांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments