सोलापूरच्या नाभिक दुकानदारांसाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

सोलापूरच्या नाभिक दुकानदारांसाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणार

 सोलापूरच्या नाभिक दुकानदारांसाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणार

संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील २,२०० हून अधिक नाभिक दुकानदारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र पतसंस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच नाभिक दुकानदारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संत सेना नाभिक दुकानदार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात पार पडली. या सभेत संघटनेच्या पुढील तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी भास्कर तमन्नूर, तर सचिवपदी सिद्राम खट्टर यांची सर्वानुमते निवड झाली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून मनोहर क्षीरसागर, पांडुरंग पाटील, सत्यनारायण रासकोंडा तसेच प्रमुख पाहुणे संजय जोगीपीटकर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ट्रस्टी अध्यक्ष आनंद सिंगराल यांनी केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सचिव अभयकुमार कांती यांनी केले.

नाभिक व्यावसायिकांसमोरील अडचणींवर चर्चा

यावेळी बोलताना आनंद सिंगराल यांनी सांगितले की, सोलापूर शहरात २,२०० हून अधिक नाभिक व्यावसायिक कार्यरत असून, त्यांच्या व्यवसायासमोर विविध अडचणी आहेत. दुकानांचे भाडे, वाढते वीजदर, व्यवसायातील चढ-उतार तसेच वयोमानानंतरच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न यामुळे नाभिक व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नाभिक दुकानदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वतंत्र पतसंस्था उभारणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या पतसंस्थेच्या माध्यमातून व्यावसायिकांना आर्थिक मदत, कर्ज सुविधा आणि व्यवसायवाढीसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वाढत्या वीजदराचा फटका

नाभिक दुकानदारांना वाढत्या वीजदराचाही मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. औद्योगिक दराने वीज आकारणी होत असल्याने व्यवसायाचा खर्च वाढत आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून नाभिक दुकानदारांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पेन्शन योजनेची मागणी

वर्षानुवर्षे नाभिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना वयोमानानंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी शासनाने नाभिक दुकानदारांसाठी स्वतंत्र पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शासनाकडे या मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भास्कर तमन्नूर यांची अध्यक्षपदी निवड

वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी भास्कर तमन्नूर, सचिव सिद्राम खट्टर, उपाध्यक्ष पांडुरंग पवार व जितेंद्र बेनाककर, कार्याध्यक्ष गोवर्धन कोडापके, खजिनदार शिवराज हडपद आणि प्रसिद्धीप्रमुख प्रकाश जोगीपीटकर यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून नाभिक दुकानदारांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

“नाभिक दुकानदारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्था उभारणे, पेन्शन योजना लागू करणे आणि वीजदराचा प्रश्न मार्गी लावणे, या प्रमुख विषयांवर संघटनेचा प्राधान्याने पाठपुरावा राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages