सिटूच्या ‘जेल भरो’ने सोलापूर दणाणले! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

सिटूच्या ‘जेल भरो’ने सोलापूर दणाणले!

 सिटूच्या ‘जेल भरो’ने सोलापूर दणाणले!

स्मार्ट मीटरविरोधात हजारो कामगार रस्त्यावर; ४०० आंदोलक ताब्यात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, विडी कामगारांना कायदेशीर किमान वेतन व रोख मजुरी द्यावी, वाढती महागाई व बेरोजगारी रोखावी, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, तसेच आरोग्य व शिक्षणावरील वाढता खर्च कमी करावा, या मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या वतीने सोमवारी सोलापुरात जोरदार ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. हजारो कामगारांनी लाल झेंडे हातात घेत रस्त्यावर उतरत शांती चौक परिसर दणाणून सोडला.

“जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर जनतेचा आक्रोश आणखी तीव्रतेने रस्त्यावर दिसेल. हे जनतेचे सरकार नसून अदानी-अंबानींचे सरकार आहे,” अशी घणाघाती टीका सिटूचे राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.

सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. नरसय्या आडम (मास्तर), राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख आणि कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दत्तनगरला पोलिसांचा गराडा; आंदोलकांनी बदलली रणनीती

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजल्यापासून दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयाला पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत घेराव घातला. त्यामुळे नियोजित ठिकाणी आंदोलकांना एकत्र येणे शक्य झाले नाही. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त झुगारून विविध भागांतील कार्यकर्ते जथ्यांच्या स्वरूपात शांती चौक, पाणी टाकी परिसरात दाखल झाले.

आंदोलकांनी गनिमी काव्याची रणनीती अवलंबत पुंजाल मैदान बोळातून अचानक मोठ्या संख्येने एकत्र येत लाल झेंडे फडकावले आणि जोरदार घोषणाबाजी करत शांती चौक गाठला. “स्मार्ट मीटर हटवा!”, “चार श्रमसंहिता रद्द करा!”, “विडी कामगारांना किमान वेतन द्या!”, “कामगार कायद्यांची अंमलबजावणी करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

चारही दिशांनी कार्यकर्त्यांची शांती चौकात धडक

कॉ. नसीमा शेख आणि सुनंदा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली दत्तनगर परिसरातून शेकडो कार्यकर्ते, अमित मंचले यांच्या नेतृत्वाखाली मोदी परिसरातून, किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली गांधी नगर परिसरातून, तर सनी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लष्कर परिसरातून तसेच बापूजी नगर परिसरातून मोठ्या संख्येने आंदोलक शांती चौकात दाखल झाले.

आंदोलकांनी शांती चौकात ठिय्या देत रस्ता रोखून ‘जेल भरो’ आंदोलन सुरू केले. अचानक मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

४०० आंदोलक ताब्यात; जेल रोड पोलिस ठाण्यात हलविले

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी मागण्यांच्या जोरदार घोषणा देत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी सुमारे ४०० आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना जेल रोड पोलिस ठाण्यात हलविले.

सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांनी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांवर आर्थिक भार लादण्याचा प्रयत्न, कामगारांचे हक्क कमकुवत करणाऱ्या चार श्रमसंहिता, विडी कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्याची भूमिका, तसेच वाढती महागाई आणि बेरोजगारी याविरोधात सरकारवर तीव्र टीका केली.

“कामगारांच्या हक्कांवर घाला घालाल, तर रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र करू,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेण्यासह कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संघर्षाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी सिटूच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग

या आंदोलनात ॲड. कॉ. अनिल वासम, कॉ. दत्ता चव्हाण, कॉ. नसीमा शेख, कॉ. शेवंता ताई देशमुख, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, वीरेंद्र, पद्मा, दाऊद शेख, नरेश दुगाणे, हनीफ सातखेड, किशोर मेहता, मलेशम कारमपुरी, पांडुरंग म्हेत्रे, दीपक निकंबे, अभिजीत निकंबे, विजय हरसुरे यांच्यासह विविध भागांतील कार्यकर्ते सहभागी झाले.

तसेच अमित मंचले, सनी शेट्टी, रविंद गेंट्याल, अरुण सामल, बालाजी गुंडे, शिवा श्रीराम, शहाबुद्दीन शेख, विजय मरेड्डी, किशोर म्हेत्रे, रहीम नदाफ, बजरंग गायकवाड, खाजाभाई करजगी, प्रशांत चौगुले, राजेश काशीद, प्रकाश कलबुर्गी, अमीन शेख, जुबेर सगरी, माजीद नदाफ, युसुफ शेख, अबू शेख, असलम शेख, पिंटू आफक, बागलकोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

कुंभारीतही सिटूचा जोरदार ‘जेल भरो’

दरम्यान, सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख मेजर आणि कॉ. विल्यम ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी येथेही जोरदार ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला, कामगार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्मार्ट मीटरविरोधात तसेच कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

कुंभारीतील आंदोलनात कॉ. युसुफ शेख मेजर, विल्यम ससाणे, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, हसन शेख, रफिक काझी, वसीम मुल्ला, बालाजी तुम्मा, नरसिंग बुगले, आफसाना बेग, राजेंद्र गेंट्याल, आप्पाशा चागले, गोपाळ बंडी, दिनेश बडगु, परशुराम बुगले, संतोष पुकाळे, शबीर नारोकाट, श्रीनिवास गोण्याल, श्रीनिवास डक्का, नागेश सरला, इमाम शेख, कुरमेश म्हेत्रे, अतीक दंडोती, मुन्ना कलबुर्गे, संगीता एडके, मधुकर चिल्लाळ, गुंडप्पा डक्का, नागनाथ जल्ला, योगेश अकीम, चंटी, बिटला, शशिकांत गुंडला, राजू गड्डम, योहान सातालोलु, हनुमंतु पेद्दी, दशरथ आमाटी, चंद्रकांत गोण्याल, कुमार येलगेटी, राजू सीता, श्रीनिवास गोण्याल आणि नरेश गुल्लापल्ली यांच्यासह असंख्य कामगार व कार्यकर्ते सहभागी झाले.

कुंभारीतही “स्मार्ट मीटर हटवा!”, “चार श्रमसंहिता रद्द करा!”, “विडी कामगारांना किमान वेतन व रोख मजुरी द्या!”, “कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

सोलापूर शहरासह कुंभारीत झालेल्या या आंदोलनातून कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सिटूने संघर्षाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. सरकारने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी व्यापक आणि तीव्र करण्याचा निर्धार सिटूच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages