एआय'च्या युगात स्वतःची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता जपा : प्राचार्य डॉ. शंकर नवले
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि., सोलापूर यांच्या वतीने सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह अंतर्गत १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मार्गदर्शन सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालय संकुलातील लोकमान्य टिळक सभागृहात पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सह. सुत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे हे होते.
आपला शैक्षणिक प्रवास उलगडताना प्राचार्य डॉ. नवले म्हणाले, "मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि आज शिक्षणाच्या निमित्ताने २० देशांमध्ये फिरलो आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखूनच करिअरचा विचार करावा. नव्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी आणि किती करावा, याला मर्यादा हवी. एखादे काम करण्यासाठी एआय मदत करेल, पण जीवनात प्रत्येक ठिकाणी एआय मदतीला येईल असे नाही. आपण आयुष्यात किती कमावले यापेक्षा केलेल्या कामातून किती आनंद मिळाला याचा विचार करा आणि नेहमी सकारात्मक राहा."
कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत आपली बुद्धमत्ता सुद्धा कायम वापरत राहिली पाहिजे, याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. रोजच्या दैनंदिन आयुष्यात आवश्यक तेव्हा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करत राहिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी आणि किती करावा याला सुद्धा मर्यादा पाहिजे, असेही प्राचार्य डॉ. नवले यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात राजशेखर शिवदारे म्हणाले, "शिक्षण क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा थांबली पाहिजे. पालकांनी मुलांच्या करिअरची अतिचिंता न करता त्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. पालकांनी आपले विचार विद्यार्थ्यांवर लादू नयेत. एआयचे भविष्यातील परिणाम काय होतील हे आताच सांगता येणार नाही, परंतु विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता कायम गुणवत्तापूर्ण ठेवली पाहिजे."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभिरे यांनी प्रास्ताविकातून संवाद साधला. मंचावर व्हा. चेअरपर्सन सुचेता थोबडे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले, व्यवस्थापक राम शर्मा, बँकेचे सीईओ संजय घाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद नारायणकर यांनी केले
कार्यक्रमाला बँकेचे समस्त संचालक मंडळ, बँकेचे सभासद, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment