होटगी रोडच्या काँक्रीटीकरणाला महापालिकेचा 'ब्रेक महापालिका प्रशासनाची नोटीस
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते साखर कारखाना या मार्गावरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असतानाच महापालिकेच्या पाणीपुरवठा पाइपलाइन, ड्रेनेजलाइन, पावसाळी पाण्याचा निचरा आणि सीडी वर्क्सशी संबंधित कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे ही कामे पूर्ण होईपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण थांबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त-२ यांच्या स्वाक्षरीने सोमवारी, १० ऑगस्ट रोजी संबंधित यंत्रणेला याबाबत आदेश देण्यात आले.
होटगी रोड एसएच-३९६ वरील महिला हॉस्पिटल ते विमानतळ आणि पुढे साखर कारखान्यापर्यंतच्या रस्त्याच्या विकासाचे काम MSIDCच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पाणीपुरवठा किंवा ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीसाठी पुन्हा काँक्रीट फोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी महापालिकेने आधी अंतर्गत युटिलिटीची सर्व कामे पूर्ण करण्याचा आग्रह धरला आहे.
महापालिका प्रशासनाने यापूर्वीच संबंधित यंत्रणेला लेखी पत्रव्यवहार करून तसेच नकाशांच्या माध्यमातून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काही महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली होती.
दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला नगरसेवक-नगरसेविका, महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. होटगी रोडच्या कामातील त्रुटी, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्याशी संबंधित प्रलंबित कामांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. रस्ता पूर्ण होण्यापूर्वी महापालिकेच्या अखत्यारितील सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आधी युटिलिटी, मग काँक्रीट
महापालिकेने आता स्पष्ट भूमिका घेत 'आधी अंतर्गत युटिलिटीची कामे पूर्ण करा आणि त्यानंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण करा', असा पवित्रा घेतला आहे. संबंधित यंत्रणा, महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुन्हा संयुक्त पाहणी व सर्वेक्षण करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या आदेशामुळे सध्या सुरू असलेल्या रस्ते कामाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. रस्ता विकासासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना भविष्यात त्याच रस्त्याची पुन्हा खोदाई होऊ नये, हा महापालिकेचा मुख्य मुद्दा आहे. मात्र, दुसरीकडे सुरू असलेले काम अचानक थांबविल्याने प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
होटगी रोड हा विमानतळाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या वादाचा थेट परिणाम वाहतूक आणि नागरिकांवर होऊ शकतो. आता दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रलंबित कामे किती जलदगतीने पूर्ण केली जातात आणि काँक्रीटीकरण पुन्हा कधी सुरू होते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment