दारू माफियांवर उत्पादन शुल्कची धाड
जिल्हाभरात धडक कारवाई, ८४ जणांवर कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. दि. १६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संयुक्त धडक कारवाईत तब्बल ८३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५२ लाख १९ हजार १०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर धोमकर, विभागीय उपायुक्त (पुणे विभाग) यांच्या निर्देशानुसार आणि श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्र. उपअधीक्षक जे. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या व्यापक कारवाईत
२४,०७५ लिटर रसायन,१,६२६ बल्क लिटर हातभट्टी दारू,३९३ बल्क लिटर देशी मद्य,१८९ बल्क लिटर बनावट देशी मद्य,३६८ बल्क लिटर विदेशी मद्य,१,१८९ बल्क लिटर परराज्यातील (गोवा) विदेशी मद्य, १७,००० बनावट बुचे, ८० बल्क लिटर बिअर, ६२५ लिटर ताडी, ३ चारचाकी व ७ दुचाकी वाहने असा एकूण ४९ लाख ६७ हजार १०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगोला (निजामपूर) येथे निरीक्षक पंढरपूर विभागाने केलेल्या कारवाईत ३४६ ब.लि. बनावट विदेशी मद्य, बनावट बुचे व लेबले जप्त करत ५.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; एक आरोपी अटक.
* सोलापूर शहर (जुना विडी घरकुल) परिसरात गोवा बनावटीचे ५६० ब.लि. विदेशी मद्य व दुचाकीसह ९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी अटक.
* मोहोळ (आष्टी) येथे भरारी पथक क्र. १ ने १८९ ब.लि. बनावट देशी मद्य जप्त; ८४ हजारांचा मुद्देमाल, एक आरोपी अटक.
* खवणी (मोहोळ) येथे संयुक्त कारवाईत २२५ ब.लि. गोवा निर्मित विदेशी मद्य, २.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
या कालावधीत अवैध मद्यविक्री व मद्यपानास परवानगी देणाऱ्या ८ ढाब्यांवर गुन्हे दाखल करून २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
अवैध मद्याबाबत माहिती असल्यास
टोल फ्री : १८००२३३९९९९
व्हॉटसअॅप : ८४२२००११३३
माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments