सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. राष्ट्रगीतामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. यावेळी प्रमुख पाहुणे संजय नवले यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, विद्यार्थ्यांची जबाबदारी तसेच राष्ट्रनिर्मितीत युवकांचा सहभाग यावर सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतगायन, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, एकता व राष्ट्रीय अभिमानाचा सुंदर प्रत्यय आला. विशेषतः देशभक्तीपर समूहगीत व प्रेरणादायी भाषणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर या शाळेचा समावेश असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती उत्तर सोलापूर यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव व नरसिंह विद्यालय, पाकणी, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी शिक्षक राजू ठाकूर व श्रीधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत संचलन सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.
या कार्यक्रमास प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. एस.एच. पवार, डॉ. आर.टी. व्यवहारे, डॉ. डी. आय. नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
.png)
0 Comments