पर्यावरण संवर्धनासाठी वनराई बंधारे उपयुक्त- जंगम
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण संवर्धनासोबतच पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने वनराई बंधारे उपयुक्त ठरत असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला. अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील वनराई बंधाऱ्याच्या पाहणी दौऱ्यात जंगम बोलत होते. यावेळी जंगम यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानांतर्गत सीईओ कुलदीप जंगम यांनी दहिटणे गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द गाव योजनेअंतर्गत तालुक्यातील पाच गावे लक्ष्यित असल्याने या दौन्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जंगम यांनी स्वच्छता, घरकूल योजना, आयुष्मान भारत योजना, महिलांची आरोग्य तपासणी, अॅनेमियाचे उच्चाटन,
महिलांच्या सभा तसेच बचत गटांमार्फत स्वयंरोजगार यांसारख्या सर्व उपक्रमांचा एकत्रित कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. यामुळे गावकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी थकीत कर वसुली डिसेंबरअखेर भरल्यास ५० टक्के सूट मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच आयुष्मान भारत कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा, त्यातून प्रशस्त वैद्यकीय मदत मिळते, असे आवाहन केले. या दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपअभियंता उषा बिडला, सहायक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधिकारी शिवलीला माळी, उपअभियंता व्ही. डी. राठोड, सरपंच नितीन मोरे, उपसरपंच शरणू कोलशेट्टी, विस्तार अधिकारी यू. एम. पठाण, ग्रामपंचायत सदस्य विकी बाबा चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी अभिमन्यू ताड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment