Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार

 माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार


कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. माढ्यात नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी उध्दवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली तर अक्कलकोटमध्ये उध्दवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी राजीनामा देऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी तर काही ठिकाणी दोन्ही सेना एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या ३६ उमेदवारांनी तर पंचायत समिती सदस्यपदासाठी दाखल केलेल्या ६२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.

आता निवडणुकीच्या आखाड्यात जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी १६ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३६ असे एकूण ५२ उमेदवार राहिले आहेत. एकंदरीत तालुक्यात किरकोळ अपक्ष वगळता भाजप विरुद्ध शिंदेसेना अन उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

असे आहे चित्र

आता निवडणुकीच्या मैदानात जिल्हा परिषदेसाठी भाजप ६, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, शिंदेसेना २ आणि उद्धवसेना १, रासप २ आणि दोन अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. पंचायत समिती १२ जागांसाठी भाजप १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ८, शिंदेसेना ४, काँग्रेस १ तर उर्वरित रासप आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष किंवा इतर पक्षांचे उमेदवार असले तरी खरी लढत ही आमदार दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात होणार आहे.

एका निंबाळकरांची माघार दुसऱ्या निंबाळकरांना लाभ

जिल्हा परिषदेच्या पानगाव गटातून विकास जाधव, बहुतांश अपक्ष आणि पक्षाच्या मुख्य उमेदवाराला पूरक म्हणून अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. दोन्ही गटांत एकही उमेदवाराने बंडखोरी केली नाही.

सासुरे पंचायत समिती गणातून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपचे संतोष निंबाळकर यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र निवडणुकीच्या रंणांगणात मतदार काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

राष्ट्रवादी (अ.प.) च्या साठेंसह उध्दवसेनेच्या तिघांची माघार

माढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद ७ जागेसाठी २० तर पंचायत समिती १४ जागेसाठी ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषदेच्या ५० इच्छुकांनी माघारी घेतली आहे. तर पंचायत समितीच्या ११० उमेदवारांकडून माघार घेण्यात आली आहे. माढ्यात चार ठिकाणी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी तर बेंबळे येथे उद्धवसेना-भाजप अशी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. करमाळा मतदारसंघातील गट व गणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात निवडणूक रंगली आहे.

राष्ट्रवादी (श.प.) ५ जागा, 3 राष्ट्रवादी (अ.प.) ४ जागा, शिंदेसेना १ जागा, वंचित बहुजन आघाडी २ जागा, अपक्ष ३, रासप १ जागवेर निवडूक लढवत आहेत. यामध्ये भोसरे व कुई गटात दोन्ही राष्ट्रवादीत लढाई होत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाकडून एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णयामुळे माढा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीला फायदा होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या १४ जागेसाठी भाजपकडून ९, राष्ट्रवादी (श.प.) ६, राष्ट्रवादी (अ.प.) ९, शिंदेसेना ३, उद्धवसेना ४, वंचित बहुजन आघाडी ५, काँग्रेस १, रासप १, अपक्ष १२ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments