Hot Posts

6/recent/ticker-posts

विमा रुग्णालयाची जागा हडप करण्यासाठीच का ओपीडीचे स्थलांतर?

 विमा रुग्णालयाची जागा हडप करण्यासाठीच का ओपीडीचे स्थलांतर?

कामगारांमध्ये संताप; निर्णयाविरोधात आवाज तीव्र
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी रस्त्यावरील राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) रुग्णालयाच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) अचानकपणे गैरसोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोयीस्कर, सुसज्ज आणि ओळखीच्या ठिकाणी असलेली ओपीडी किनारा हॉटेलसमोरील जिल्हा उद्योग केंद्राजवळील बीएसएनएलच्या इमारतीत हलविण्यात आली असून, हा निर्णय संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विमा रुग्णालयाची मोक्याची जागा हडप करण्यासाठीच हे स्थलांतर तर नाही ना? असा थेट सवाल कामगारांमधून उपस्थित होत आहे.
सोलापूर शहरात पूर्वी कापड व सूत गिरण्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत असताना दमाणीनगर, सुपर मार्केट आणि रंगभवन येथील समाजकल्याण कार्यालयात अशा तीन ठिकाणी कामगारांसाठी बाह्यरुग्ण विभाग चालविला जात होता. त्यानंतर समाजकल्याण येथील ओपीडी बंद करून तो होटगी रस्त्यावरील राज्य कामगार विमा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला. गेल्या तब्बल २५ ते ३० वर्षांपासून याच ठिकाणी कामगारांना ओपीडीमार्फत दर्जेदार व सोयीस्कर आरोग्यसेवा मिळत होती.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे हा बाह्यरुग्ण विभाग बीएसएनएलच्या इमारतीत हलविण्यात आला आहे. या बदलाची माहिती अनेक कामगारांना नसल्याने ते अद्यापही जुन्या ठिकाणी येत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी आजारी कामगारांना उपचाराअभावी परत फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.
बीएसएनएलची ही इमारत मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तेथे पोहोचणे कठीण ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सुविधा, रिक्षाचालकांकडून जादा भाड्याची मागणी यामुळे कामगारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आजारपणातही उपचारासाठी धडपड करावी लागणे हे अत्यंत अमानुष असल्याची भावना कामगार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, विमा रुग्णालयाची सुसज्ज इमारत असूनही ओपीडी तेथून हलविण्याचे नेमके कारण काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात त्या जागेचा अन्य कारणांसाठी वापर करण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका कामगार संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ओपीडी पूर्ववत होटगी रस्त्यावरील विमा रुग्णालयातच सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
चौकट
ईएसआयसीच्या सूचनेनुसार स्थलांतर – प्रशासनाचे स्पष्टीकरण
ईएसआयसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णालय आणि बाह्यरुग्ण विभाग (डिस्पेन्सरी) हे स्वतंत्र ठिकाणी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अनेक विमा रुग्णालयांमधील ओपीडी याच कारणामुळे स्वतंत्र ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. सोलापूरमध्ये बीएसएनएलच्या इमारतीत कामगारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तातडीच्या सेवेसाठी कामगार थेट विमा रुग्णालयात जाऊ शकतात.-डॉ. मिलिंद चौधरी
 चौकट २
ईएसआयचा निर्णय खपवून घेणार नाही – नरसय्या आडम
राज्य कामगार विमा रुग्णालयातील ओपीडी बंद करून तो होटगी रोडवरील बीएसएनएल परिसरात हलविण्याचा निर्णय हा पूर्णतः कामगारविरोधी, अमानुष आणि अविचारी आहे. या निर्णयामुळे रोज उपचारासाठी येणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. नवीन ओपीडीचे ठिकाण वाहतुकीअभावी कामगारांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे. कामगार हा या व्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या आरोग्यावर घाव घालणारा कोणताही निर्णय कामगार चळवळ खपवून घेणार नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments