जनसंघापासून भाजपात असलेले तानवडे गेले शिवसेनेत
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला तानवडे परिवार अखेर भाजपमधून बाहेर पडला असून गुरुवारी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण तानवडे परिवार व त्यांच्या समर्थक गटाने शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, वागदरी गटाचे उमेदवार प्रवीण तानवडे, प्रशांत तानवडे, अजित तानवडे, विजयकुमार तानवडे, बसवराज तानवडे, तसेच श्रीशैल ठोंबरे, शिवानंद घोळसगाव, श्रीकांत जिरगे, संगप्पा चानकोटे, दीपक कवडे, महादेव पालापुरे, इरेशा बागेवाडी, राजू राठोड, विजय बिराजदार यांच्यासह मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी तानवडे परिवाराचे शिवसेनेत स्वागत करत, “तानवडे परिवाराने अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. शिवसेनेत त्यांचा योग्य सन्मान राखून त्यांना चांगली संधी दिली जाईल,” अशी ग्वाही दिली.
दरम्यान, बुधवारी वागदरी जिल्हा परिषद गटातून प्रवीण दत्तात्रय तानवडे यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे माजी आमदार स्व. बाबासाहेब तानवडे यांच्यापासून तानवडे परिवाराने भाजप संघटनेसाठी दीर्घकाळ कार्य केले आहे. आनंद तानवडे हे दोन वेळा भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता.
मात्र वागदरी गटातून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तानवडे परिवाराने अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आनंद तानवडे यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर मोठा दबाव होता. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चीज होत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घ्यावा लागला.”
तानवडे परिवाराच्या या निर्णयाचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 Comments