महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघात फूट
शिक्षकेतर संवर्गातील नसल्यामुळे डॉ. सुजित सिंग यांच्या सरचिटणीस पदाला विरोध
जी. वाय. पाटील अध्यक्ष, एम. के. राऊळ सरचिटणीस
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघात फूट पडली असून महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. सुजित सिंग यांच्या सरचिटणीस पदाला विरोध झाला आहे.
मणिबेन एम. पी. शहा महिला महाविद्यालय मुंबई येथे सात विभागीय संघटनांची बैठक झाली होती. डॉ. आर. बी. सिंह यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्या अनुषंगाने २६.११.२०२४ रोजी आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये महासंघाचे अध्यक्ष रा.जा. बढे व कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांनी महासंघाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता किंवा महासंघाच्या कार्यकारीणीची बैठक न बोलाविता स्वतःच्या मर्जीने परस्पर महासंघाच्या सरचिटणीसपदी डॉ. सुजित सिंग यांची निवड केली होती. त्यामुळे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा हक्कभंग झाल्यामुळे अध्यक्ष बढे व कार्याध्यक्ष जोशी यांना महासंघातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्या रिक्त जागी सर्वानुमते महासंघाचे उपाध्यक्ष जी. वाय. पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर महासंघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बारस्कर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
डॉ. सुजित सिंह, शिक्षकेतर संवर्गातील नसल्यामुळे ते महासंघाचे पदाधिकारी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची निवड ही बेकायदेशीर असल्यामुळे त्यांची निवड अमान्य करण्यात येत आहे. त्यांच्या जागी महासंघाचे उपाध्यक्ष एम. के. राऊळ यांची महासंघाचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली.
महासंघाचे जळगांव विभागाचे अध्यक्ष जी. वाय. पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ऋषिकेश चित्तम यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमरावती विभागाचे उपाध्यक्ष डी. एम. बारस्कर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे प्रशांत देशमुख यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मुंबई विभागाचे उपाध्यक्ष एम. के. राऊळ यांची सदचिटणीसपदी निवड झाल्यामुळे प्रविण खामकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापुढे महासंघाचे कामकाज सर्व विभागांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एकत्रितपणे व सर्वांना विश्वासात घेऊन करण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. यापुढे सात विभागांची कार्यकारीणी हाच खरा महासंघ म्हणून काम करणार आहे.

No comments:
Post a Comment