सोलापूर महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी मतदान व मतमोजणी तयारीचा आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 3, 2026

सोलापूर महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी मतदान व मतमोजणी तयारीचा आढावा

 सोलापूर महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी मतदान व मतमोजणी तयारीचा आढावा




आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; पारदर्शक व शांततापूर्ण निवडणुकीचे निर्देश


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


या बैठकीत येणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा, मनुष्यबळ, साहित्य, तांत्रिक सुविधा तसेच सुरक्षा व व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रांवरील मूलभूत सोयी-सुविधा, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता व सुरक्षित हाताळणी, मतमोजणी केंद्रांची तयारी, वीज व पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, अग्निसुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने घ्यावयाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.


यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामे पूर्ण करावीत तसेच कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही आयुक्तांनी नमूद केले. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पर्यायी नियोजन (कंटिजन्सी प्लॅन) तयार ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, प्र. मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमारे, सहायक नगररचना अधिकारी मनिष भीष्णूरकर, सहायक आयुक्त गिरीष पंडित, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकुलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अग्निशमन प्रमुख राकेश साळूंखे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


महापालिका निवडणूक सुरळीत व विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages