Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाचा डाव फसला; अपक्ष उमेदवाराचा अर्ज कायम

 भाजपाचा डाव फसला; अपक्ष उमेदवाराचा अर्ज कायम



सुचकाला फरफटत नेण्याचा प्रयत्न, निवडणूक कार्यालयाबाहेर तणाव; पोलिसांचा हस्तक्षेप


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग 3 अ मध्ये मोठा गोंधळ उडाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजप आणि एकनाथ शिंदे गटासाठी अडचणीचा ठरलेला अपक्ष उमेदवार बाबुराव जगताप यांचा अर्ज माघारी जावा, यासाठी झालेला कथित प्रयत्न अखेर फसला. या प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवाराच्या सुचकाला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून, निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच विविध प्रभागांत राजकीय हालचालींना वेग आला होता. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेत पक्षीय उमेदवारांना पाठिंबा दिला. मात्र प्रभाग 3 अ मध्ये अपक्ष उमेदवार बाबुराव जगताप यांनी निवडणुकीत ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने प्रमुख पक्षांची चिंता वाढली होती.


अपक्ष उमेदवार बाबुराव जगताप यांचे सुचक संतोष कोटा असल्याची माहिती आहे. भाजपचे उमेदवार राजकुमार पाटील यांनी सुरुवातीला संतोष कोटा यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोटा यांनी शेवटपर्यंत माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवली. याच कारणातून निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर वादाला तोंड फुटले.


अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद व्हावा किंवा तांत्रिक माघारीसाठी सुचकाची स्वाक्षरी मिळवण्याच्या उद्देशाने भाजप कार्यकर्त्यांनी संतोष कोटा यांना निवडणूक अधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, वेळ संपल्याचे सांगत काही कार्यकर्त्यांनी दारात उभे राहून अडथळा आणला. यावरून जोरदार आरडाओरडा झाला आणि सुचकाला फरफटत नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.


परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सर्व संबंधितांना निवडणूक कार्यालयाबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सुचक संतोष कोटा यांना थेट विचारणा केली असता, त्यांनी स्पष्टपणे “माघार घेणार नाही” अशी भूमिका मांडली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून हटवले. या वेळी भाजप उमेदवार राजकुमार पाटील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.


यानंतर भाजपचे उमेदवार राजकुमार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, “सुचक संतोष कोटा हे माघार घेण्यास तयार होते. मात्र बिपीन पाटील आणि सूरज पाटील यांनी त्यांना अडवले, त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला.”


प्रभाग 3 अ मध्ये आता भाजपचे राजकुमार पाटील, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुरेश बिद्री आणि अपक्ष बाबुराव जमादार (जगताप) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. अपक्ष उमेदवार निवडणुकीत ठाम राहिल्याने येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत.


या घटनेमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीतील राजकीय डावपेच, दबावतंत्र आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments