सोलापूर विद्यापीठात ग्रंथालय क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठे व महाविद्यालयांतील ग्रंथालयांनीही आमूलाग्र परिवर्तन स्वीकारणे आवश्यक असून पारंपरिक छापील ग्रंथांसोबतच डिजिटल स्वरूपातील ज्ञानसाधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने पीएम उषा विभागाच्या सहकार्याने ग्रंथालय क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर हे बोलत होते. यावेळी मुंबई येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण तसेच उल्हासनगर येथील ग्रंथालय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय काळबंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. अनिल घनवट यांनी केंद्राच्या कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कुलगुरू डॉ. महानवर पुढे म्हणाले की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता ही तेथील ग्रंथालयाच्या सशक्ततेवर अवलंबून असते. आधुनिक काळात डिजिटल ग्रंथालयांमुळे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना जगभरातील ज्ञानस्रोत सहज उपलब्ध होतात. त्यामुळे शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना मिळते. ग्रंथालये ही केवळ पुस्तके साठवण्याची जागा न राहता ती ज्ञाननिर्मितीची केंद्रे बनली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटनानंतर झालेल्या तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. सुभाष चव्हाण आणि तज्ज्ञ दत्तात्रय काळबंडे यांनी डिजिटल ग्रंथालय संकल्पना, ई-संसाधनांचे व्यवस्थापन, आधुनिक ग्रंथालय सेवा आणि भविष्यातील आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी डॉ. एस. व्ही. लोणीकर, डॉ. एस. एस. सूर्यवंशी, पी. टी. रणदिवे, पंकज जावळे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील ग्रंथपाल, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन ग्रंथालय सहायक डॉ. पल्लवी सावंत यांनी केले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ग्रंथालय क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, मुंबई येथील डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. दत्तात्रय काळबंडे, डॉ. अनिल घनवट आदी.
0 Comments