Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी नगरपालिकेकडे १० कोटी ८७ लाख रुपयांचा कर जमा

 बार्शी नगरपालिकेकडे १० कोटी ८७ लाख रुपयांचा कर जमा



बार्शी (कटूसत्य वृत्त):-बार्शी नगरपालिका प्रशासनाने घरपट्टी व नळपाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाला शहरातील मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १० कोटी ८७ लाख रुपयांचा कर नगरपालिकेकडे जमा झाल्याची माहिती कर अधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी दिली.

घरपट्टी व नळपाणीपट्टी वेळेत भरण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत होती. मुदत संपल्यानंतर दोन टक्के व्याज आकारले जाणार असल्याने नागरिकांनी कर भरण्यासाठी तत्परता दाखवली. शहरातील मालमत्ताधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

यानुसार १ ते १४ डिसेंबर या कालावधीतच १ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली झाली. नगरपालिका मुख्याधिकारी तैमूर मुलाणी व कर अधिकारी विठ्ठल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

विशेष बाब म्हणजे ३१ डिसेंबर रोजी कर भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी सर्व्हर डाऊन असतानाही कर अधिकारी पाटोळे यांनी नागरिकांशी संवाद साधत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्यामुळे शेवटच्या दिवशीही कर भरणा सुरळीत पार पडला.

कर वसुलीची प्रक्रिया वेगाने सुरू ठेवण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नगरपालिका कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजन व सुविधांमुळेच मुदतीत मोठ्या प्रमाणात कर वसुली शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments