Hot Posts

6/recent/ticker-posts

कोठे यांच्यावर मराठा समाजाचा संताप

 कोठे यांच्यावर मराठा समाजाचा संताप




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजातील नेत्यांचा सातत्याने वापर केल्याचा गंभीर आरोप मराठा समाजाचे नेते राम भैय्या जाधव यांनी केला आहे. बाळे येथे आयोजित एका राजकीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाने वेळीच सावध राहण्याचे आवाहन केले.

राम भैय्या जाधव म्हणाले की, “कोठे यांनी यापूर्वी मराठा समाजाचे राजाभाऊ खराडे, त्यानंतर अमोल शिंदे आणि आता पद्माकर काळे यांचा केवळ स्वतःचे राजकारण पुढे नेण्यासाठी वापर केला आहे. गरज संपली की संबंधित व्यक्तींना बाजूला केले जाते. हा प्रकार मराठा समाजासाठी धोक्याचा आहे.”

जाधव यांनी आरोप केला की, मराठा समाजाची संख्या, ताकद आणि भावनिक मुद्द्यांचा उपयोग करून काही नेते स्वतःचे राजकीय हितसंबंध साधतात. मात्र प्रत्यक्षात समाजाच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. “निवडणुका आल्या की समाजाची आठवण होते आणि काम संपले की समाजाला वाऱ्यावर सोडले जाते,” अशी टीका त्यांनी केली.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पद्माकर काळे यांचे नाव पुढे करून पुन्हा एकदा मराठा समाजाची मते एकत्र करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जाधव म्हणाले की, “हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. समाजाने इतिहासातून धडा घेतला पाहिजे.”

यावेळी राम भैय्या जाधव यांनी मराठा समाजातील कार्यकर्ते, युवक आणि पदाधिकारी यांनी कोणत्याही एका नेत्याच्या किंवा पक्षाच्या वैयक्तिक अजेंड्याचे साधन बनू नये, असे स्पष्ट केले. “समाजहित, शिक्षण, रोजगार आणि आरक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्यांनाच पाठिंबा द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

बाळे येथील या बैठकीत स्थानिक कार्यकर्ते, मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठे यांच्याविरोधातील आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात याचे पडसाद सोलापूर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments