वैध उमेदवारांच्या यादीतून अमोल शिंदेंचे नाव गायब
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ ड (सर्वसाधारण) मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचे नाव छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वैध उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रशासनाच्या या गंभीर चुकीमुळे निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हताच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अमोल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरलेला असतानाही, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर झालेल्या यादीत त्यांच्या नावाऐवजी नरेश मोहिते यांचे नाव आढळून आले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच अमोल शिंदे यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात धाव घेऊन जाब विचारला. चौकशीअंती चूक लक्षात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन विजया पांगरकर यांनी ही चूक “प्रिंटिंग मिस्टेक” असल्याचे सांगत दुरुस्त यादी प्रसिद्ध केली.
हा प्रकार समोर येताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला. अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयात ठिय्या मांडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
या प्रकरणात केवळ शिंदे गटच नव्हे तर विविध पक्षांचे नेतेही अमोल शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आले.
यामध्ये काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, ज्ञानेश्वर सपाटे, अनिकेत पिसे, कुमूद अंकारम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी भाजपच्या एबी फॉर्म खिडकीतून दिलेल्या प्रकरणामुळे निवडणूक कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता थेट वैध उमेदवाराच्या नावाचीच यादीतून गळती झाल्याने, “ही चूक केवळ अनावधानाने झाली का, की यामागे काही वेगळे हितसंबंध आहेत?”
असा प्रश्न नागरिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
अर्ज स्वीकारण्यापासून छाननीपर्यंत रोज काही ना काही चुका घडत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच होत्या. मात्र, वैध उमेदवाराचे नावच यादीतून गायब होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून नवी यादी प्रसिद्ध केली असली, तरी “निवडणूक प्रक्रियेत इतक्या गंभीर चुका कशा आणि का घडत आहेत?” हा प्रश्न आता सोलापूरकरांच्या मनात घर करून बसला आहे.
.png)
0 Comments