Hot Posts

6/recent/ticker-posts

देशमुख झाले, आता गोरे–कोठेंच्या गटबाजीत विकास हरवला

 देशमुख झाले, आता गोरे–कोठेंच्या गटबाजीत विकास हरवला




सोलापूर जिल्ह्यात गटबाजीचा शाप कायम; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राजकीय प्रवास संपुष्टात


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राजकारणात सत्ता येते आणि जाते; मात्र सत्तेसाठी निर्माण होणारी गटबाजी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कायमस्वरूपी लागलेली जखम ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर गटबाजीचे आरोप होत असताना, हा प्रकार नवीन नसून याआधी आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या काळातही अशीच परिस्थिती होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.


सत्तेच्या वर्चस्वासाठी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे विकासाचे मुद्दे दुय्यम ठरले असून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. संघर्षातून उभे राहिलेले, पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते डावलले गेले, तर घराणेशाही, जवळचे नातेवाईक आणि सत्तेच्या केंद्राजवळील व्यक्तींना पुढे आणले गेल्याचा आरोप होत आहे.


राजकीय जाणकारांच्या मते, गटबाजी ही केवळ व्यक्तींची समस्या न राहता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय संस्कृतीचा गंभीर प्रश्न बनली आहे. सत्ता असताना गट तयार होतात, प्रतिस्पर्धी गटाला संपवण्याचे प्रयत्न होतात आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान निष्ठावंत कार्यकर्त्यांचे होते. अनेकांनी खुलेपणाने सांगितले की, वर्षानुवर्षे पक्षासाठी मेहनत करूनही केवळ योग्य गटात नसल्यामुळे त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात आले.


काल ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्यावर आज गटबाजीचे आरोप होत आहेत आणि आज सत्तेत असलेल्यांनाही उद्या त्याच प्रश्नांना सामोरे जावे लागणार, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या कार्यकाळात जे आरोप झाले, त्याच स्वरूपाचे आरोप आज जयकुमार गोरे आणि देवेंद्र कोठे यांच्यावर होत असल्याने “वेळ बदलते, चेहरे बदलतात; पण गटबाजी मात्र कायम राहते,” अशी खंत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर 'जशी करणी तशी भरणी’चा अनुभव येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


सध्याच्या घडामोडींमध्ये होत असलेली टीका ही केवळ काही नेत्यांपुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण राजकीय प्रवृत्तीवर असल्याचे बोलले जात आहे. सत्तेचा आणि कुटुंबाचा राजकीय गड मजबूत करण्यासाठी केले जाणारे प्रयोग हे कार्यकर्त्यांच्या हिताचे असल्याचे भासवू नये, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. व्यक्ती नव्हे, प्रवृत्तीवर टीका होत आहे.


गटबाजीमुळे जिल्ह्यातील विकासकामे, सर्वसमावेशक नेतृत्व आणि संघटनात्मक बळ कमकुवत होत असल्याचा आरोप आहे. जर कार्यकर्त्यांना न्याय देणारे, विकासाभिमुख राजकारण झाले नाही, तर जनतेचा आणि पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळत जाईल, असा इशाराही दिला जात आहे.


सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीचा हा इतिहास पुन्हा पुन्हा उजेडात येत असून, यातून धडा घेतला नाही तर पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच बळी जाणार, यात शंका नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments