Hot Posts

6/recent/ticker-posts

मुस्लिमांवर हात उचलाल तर हात तोडून टाकू - माजी आमदार कदम

 मुस्लिमांवर हात उचलाल तर हात तोडून टाकू - माजी आमदार कदम 




 तुतारी वर निवडून आलेला गद्दार आमदार छोटा हत्ती; शिवसेना (शिंदे)  नेत्यांचा घरात १० कोटी चे घबाड 

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषद निवडणूक तापलेली असताना माजी आमदार रमेश कदम यांनी गवत्या मारुती चौकातील प्रचारसभेत जोरदार हल्लाबोल करत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले. मुस्लिम युवकावर झालेल्या कथित मारहाणीचा उल्लेख करीत कदम यांनी “मुस्लिम युवकांवर हात टाकलात, तर हात तोडून टाकेन; माझ्यावर १५वी केस पडली तरी हरकत नाही” असा स्फोटक इशारा दिला.

कदम म्हणाले, “मोहोळमध्ये सर्वधर्मीय लोक शांततेत राहतात. पण निवडणुकीच्या नशेत कोणीतरी मुस्लिम युवकांना घाबरवण्याचा, व्यवसायात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. एका शिवसेना (शिंदे) नेत्याने दारूच्या नशेत मुस्लिम युवकाला मारहाण केली, याला मोहोळकर माफ करणार नाहीत.”

सभेत बोलताना कदम विद्यमान आमदार राजू खरे यांच्यावरही जोरदार टीका करताना म्हणाले, “तुतारीवर निवडून आलेला आमदार छोटा हत्ती आहे. कधी घड्याळाकडे, कधी धनुष्यबाणाकडे, तर कधी शरद पवारांकडे धाव घेतो. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना मोहोळकरांनी धडा शिकवावा.”

कदम हे मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके यांच्यावरही गंभीर आरोप करत म्हणाले की,“लोकनियुक्त बॉडी नसल्याचा फायदा घेत सर्व नातेवाईकांना मोहोळमध्ये आणून सुमारे १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ही रक्कम शहरातील एका पतसंस्थेत ठेवल्याचा माझ्याकडे पुरावा आला आहे.”

कदम पुढे म्हणाले, “शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एका स्थानिक नेत्याच्या घरातही सुमारे १० कोटींचे घबाड ठेवले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांनाही याची माहिती असूनही कारवाई होत नाही. पैसे आलेत तर लोकांना द्या ना, घरात कशाला लपवता?”

“मी आमदार असताना बाजारपेठ वाचवली; नगरपालिकेत पाऊलही ठेवले नाही” आपल्या कामांची आठवण करून देताना कदम म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांनी जेसीबी घेऊन बाजारपेठ पाडण्यास सुरुवात केली होती, तेव्हा मीच ढाल बनून उभा राहिलो. माझ्या छातीचा खोट केला, पण व्यापाऱ्यांना वाचवलं. मी कधीही नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप केला नाही.”

मोहोळमधील पाण्याच्या गंभीर समस्येवर बोलताना कदम यांनी सांगितले, “पाण्याची मोटार बंद पडली की शहरात आठ दिवस पाणी येत नाही. मी आमदार असताना दीड कोटींचे टँकर, बोअर मशीन, रस्त्यांसाठी यंत्रणा स्वखर्चाने आणली. ‘मागेल त्याला पाणी’ आणि ‘मागेल त्याला रस्ता’ ही योजना पुन्हा सुरू करायची असेल तर तुतारीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या.”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी संदीप जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments