Hot Posts

6/recent/ticker-posts

मत विकू नका! 5-10 हजार रुपयांसाठी पुढची 5 वर्षे यातना सहन करायची वेळ आणू नका

 मत विकू नका! 5-10 हजार रुपयांसाठी पुढची 5 वर्षे यातना सहन करायची वेळ आणू नका




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानाची तारीख 2 डिसेंबर आता अवघ्या दोन दिवसावर आलेली आहे, अशावेळी सर्वत्र लक्ष्मी दर्शन, आमिषे, प्रलोभन, गुंडागर्दी, दहशत यांचा गलका सुरू आहे.

मोठमोठे राजकीय नेतेही ‌'त्यांचे पैसे घ्या आणि आम्हाला मत द्या‌' असे भर जाहीर सभातून म्हणत आहेत. अशावेळी आपल्या मतदानाच्या पवित्र हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी मतदारराजा आता तुझ्यावरच आहे.

कोणत्याही आमिषाला बळी पडून दहशतीच्या दबावाखाली कोणाच्या उपकाराखाली जर मतदान दिले गेले तर पुढील पाच वर्षे मतदाराला प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. नगरसेवकरुपी सेवक आपल्याला दारातसुद्धा उभे करत नाहीत. ‌'काय तुमची कामं करायची, मला काही फुकट निवडून दिले का‌' असे बेलगामपणे आपल्या तोंडावरच म्हणतात आणि मग गल्लीतील फुटलेले गटार,अवेळी येणारे पाणी, साचलेला कचरा, औषधे-डॉक्टरविना असलेला दवाखाना याला तोंड देत जगायची वेळ मतदाररूपी नागरिकांवर येते.

मतदानामध्ये पैसा, जेवणावळी, ढाबा पार्टी, भेटवस्तू, देवदर्शन सहली अशा निरनिराळ्या आमिषामुळे ही कार्यकर्त्यांची निवडणुक पैशावाल्यांच्या हातात गेली आहे. चांगला कार्यकर्ता जो मनोभावे लोकांची सेवा करू इच्छितो त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यामध्ये स्वतःचा आनंद मानतो असे सेवाभावी कार्यकर्ते यामुळे पूर्णपणे हद्दपार होत आहेत. या कार्यकर्त्यांना आणि सदैव आपल्याला उपलब्ध असलेल्या सेवाभावी लोकांना निवडून द्यायचे असेल तर या आमिषांपासून स्वतःला दूर ठेवण्याचे कर्तव्य मतदार राजालाच करावे लागणार आहे.

‌'मतदारराजा जागा हो‌' येत्या दोन दिवसात होणाऱ्या प्रलोभनांच्या पावसाला बळी पडू नका, कोणाचा पैसाही स्वीकारू नका आणि त्याला मतही देऊ नका, जो तुम्हाला योग्य वाटतोय अशा उमेदवाराला मत द्या, त्यामुळेच राजकारणाच्या या पवित्र गंगेमध्ये घुसलेले गुंठेवाले, मटकेवाले, जुगारवाले, दारूवाले, वाळूवाले आणि गुंडागर्दीवाले या प्रक्रियेतून पूर्णपणे नाहीसे होतील, नाहीतर हेच लोक निवडून येत आहेत, हे राजकीय पक्षांना आता कळलेले आहे, त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतेही यांच्याच मागे उभे राहू लागले आहेत.

त्यामुळे जनतेची सेवा करणारे सेवाभावी कार्यकर्ते हळूहळू राजकारणातून दूर होऊ लागले आहेत आणि आपल्या लोकशाहीचा पाया या अशा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधून राखला जातो आणि याच मांडणीने, शिडीने आपले आमदार, खासदार निवडून येतात आणि विधिमंडळ आणि संसदेत आपल्यासाठी कायदे बनवतात, धोरण ठरवतात, लक्षात घ्या मतदानाच्या वेळीचे पाच, दहा हजार हे नंतर सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला, एखादे चुकीचे धोरण राबवलं तर पूर्ण एक पिढी रसातळाला घालू शकतो.

राजकारणामध्ये प्रशासनामध्ये अशा काळाबाजारवाल्यांचे वर्चस्व सध्या वाढलेलेच आहे, ते वाढते वर्चस्व कमी करायचे असेल तर यांना बाजूला करण्याची ताकद फक्त आपल्या एका मतात आहे, मतदारराजा जागा हो ! आणि यांना एकदा वठणीवर आण.

Reactions

Post a Comment

0 Comments