Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात शिक्षकांचा विराट मोर्चा; टीईटी विरोधात केला एल्गार

 सोलापूरात शिक्षकांचा विराट मोर्चा; टीईटी विरोधात केला एल्गार






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, नवीन संच मान्यतेच्या जाचक अटीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांनी शाळांना दांडी मारुन शुक्रवारी (दि.5) जिल्हाधिकारी कार्यालयांवर हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला.

या मोर्चात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांचा समावेश होता.

जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी दुपारी दोनच्या सुमारास चार पुतळा येथून मोर्चाला सुरुवात केली. पार्क चौक, सिद्धेश्वर प्रशाला येथून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज गेट येथे आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांनी टीईटी, जाचक संच मान्यता, अशैक्षणिक कामे बंद करावे, अशी मागणी केली. पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरती धोरणामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक सभा, शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना तर माध्यमिक शिक्षकांच्या टीडीएफ, मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक कृती समिती , अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आदी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने, तानाजी माने, सुरेश पवार, अनिरुद्ध पवार, राम शिंदे, नवनाथ गेंड, बापूसाहेब अडसूळ, सचिन झाडबुके, मच्छिंद्र मोरे, कृष्णा हिरेमठ, गिरीश जाधव, सुरेश राठोड, शामराव जवंजाळ, सुधीर कांबळे, श्रीशैल कोरे, मच्छिंद्र भांडेकर आधी शिक्षक उपस्थित होत. टीईटी, जाचक संच मान्यतेसह इतर मागण्यासाठी सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन जिल्ह्यातील काही अपवाद वगळता इतर सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

शिक्षकांच्या या आहेत मागण्या

नवीन संच मान्यता रद्द करावी
शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षकांना बंधनकारक नको
टीईटीमुळे थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी
जुनी पेन्शन योजना लागू करावी
शिक्षण सेवक योजना रद्द करावी
सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा
अशैक्षणिक कामे व अनाठायी उपक्रम बंद करावे
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी
आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी

पुण्यातील शिक्षकांनी देखील आंदोलन केले. टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. शिक्षणामध्ये कंत्राटीकरण नसावे, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा बंद ठेऊन पुणे जिल्हातील विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी नवीन जिल्हा परिषद – सेंट्रल बिल्डिंग – जिल्हाधिकारी कार्यालय असा एल्गार मोर्चा शुक्रवारी (दि. ५) रोजी काढला.

Reactions

Post a Comment

0 Comments