Hot Posts

6/recent/ticker-posts

गांजा दारू विक्रेते यांना हाताशी धरून पॅनल उभे केले

 गांजा दारू विक्रेते यांना  हाताशी धरून पॅनल उभे केले 



धैर्यशील मोहिते-पाटील यांचे  विरोधकांना चोख प्रत्युत्तर


अकलूज(कटूसत्य वृत्त):-

गांजा दारू विक्रेते यांना हाताशी धरून अकलूज नगरपरिषदेवर पॅनल उभे केले आहे.हे जर निवडून आले तर भविष्यात अकलूजमध्ये खुलेआम ड्रग्ज विकले जातील.

तर आमच्या पतसंस्था बुडण्याच्या अगोदर आमच्या विरोधकांच्या पतसंस्था बुडाल्या हे ते लपवून ठेवतात. पाटील वस्तीच्या पुलाचे काम माने यांच्यामुळेच रखडले आहे. त्याचा त्रास अख्ख्या तालुक्याला होत आहे आणि हे लोक चाललेत शहराचा विकास करायला. या अकलूज, माळशिरस तालुक्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते. पण मी अकलूजकरांसाठी जेल भोगण्यासही तयार असल्याचे सांगत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे व्हिडिओ स्क्रीनवरती दाखवत त्यांची पोलखोल केली.


अकलूज नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत खासदार मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी महेबूब शेख, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, वसंतनाना देशमुख, किशोरसिंह माने-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, नामदेव वाघमारे, दत्ता पवार, संभाजीराजे शिंदे उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, राज्यातील सत्तेच्या जोरावर भ्रष्ट अधिकाऱ्यांना माळशिरस तालुक्यात आणून, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातील हप्ते यांना खायचे आहेत. हे लोक आमच्या सहकारी संस्था बुडाल्या म्हणून छाती बडवून घेत आहेत. पालकमंत्री गोरे हे गेली १६ वर्षे माण-खटावचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भागात एक तरी सहकारी संस्था काढून लोकांच्या हाताला काम दिले का? ते सांगावे. नगरपरिषद विरोधात गेली तर तुमच्या नगरपरिषदेला निधी मिळू देणार नसल्याची धमकी हे लोक देत आहेत. आम्हीही मोहिते-पाटील आहोत. कोणाच्या घशात कसा हात घालून निधी कसा खेचून आणायचा हे आम्हाला चांगले माहीत असल्याचे ते म्हणाले.

सध्या नगरपरिषदेचे कर हे मोठ्या शहरांच्या शेजारील नगरपालिकाच्या सरासरी दरावर आधारित आहेत. हे दर आपल्या सारख्या छोट्या नगरपरिषदांना परवडणारे नाहीत. ते कमी करून घेण्यासाठी आम्ही नगरपरिषदेचा ठराव करू. त्यासाठी आमदार जानकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील विधानसभेत आवाज उठवतील. अकलूजमधील व्यापाऱ्यांवर कोणतीही करवाढ होणार नाही. महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून गावात इलेक्ट्रिक रिक्षा सुरु करू. पुढच्या निवडणुकीच्या अगोदर सर्व प्लॉटधारकांना पक्की घरे बांधून देणार. कचऱ्याची अशी विल्हेवाट लावू की अकलूज हे देशातील सर्वात सुंदर शहर बनले पाहिजे, असे आश्वासन मोहिते-पाटील यांनी दिले.


मेहबूब शेख यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी जयसिंह मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मतदारांना तुतारी आणि मशाल या चिन्हांसमोरील बटन दाबून उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments