सांगोल्यात खळबळ! माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर LCB ची धाड
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय खळबळ उडवत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर पोलिस विभागाच्या LCB (Local Crime Branch) पथकाने शनिवारी संध्याकाळी अचानक धाड टाकली. या कारवाईत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे काही उमेदवारांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून धाड नेमकी कोणत्या प्रकरणात झाली याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
धाडीची बातमी जाहीर होताच सांगोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक धिंगाणा सुरू असताना LCB ची ही धाड निवडणुकीवर मोठा परिणाम करणारी मानली जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांत आणि उमेदवारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे.
धाडी नंतर प्रतिक्रिया देताना शहाजीबापूंनी प्रचंड संताप व्यक्त करताना म्हणाले की, “ही सरळसरळ दबावाची आणि राजकीय सूडबुद्धीची कारवाई आहे. लोकांचा पाठिंबा दिसू लागला की भाजप सरकारी यंत्रणा वापरून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करते.”
दरम्यान, सांगोल्यात भाजपने शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) हातमिळवणी करून काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर शेकाप उमेदवार रिंगणात उतरवल्याची माहितीही समोर आली आहे. या समीकरणामुळे सांगोल्यातील राजकारण आणखीन तणावपूर्ण झाले आहे.
एका सर्वेक्षणानुसार (पोल) सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी एकाही नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष होणार नाही असा अंदाज व्यक्त झाला आहे. त्यातच सांगोल्यात शहाजी पाटील गटाचे आनंद माने हे नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक आघाडीवर असल्याचेही भाकीत करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर झालेली LCB ची धाड हा योगायोग नसून राजकीय दबावाचा भाग असू शकतो, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
धाडीचा अहवाल अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेला नसला तरी सांगोल्यातील निवडणुकीचे गणित आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत पोलिसांकडून तपशील जाहीर होण्याची शक्यता असून सर्वांची नजर त्यावर लागली आहे.
0 Comments