आषाढी वारीसाठी कोट्यवधींचा खर्च; औषधांवर १० कोटी, जर्मन हँगरवर ८ कोटी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

आषाढी वारीसाठी कोट्यवधींचा खर्च; औषधांवर १० कोटी, जर्मन हँगरवर ८ कोटी

 आषाढी वारीसाठी कोट्यवधींचा खर्च; औषधांवर १० कोटी, जर्मन हँगरवर ८ कोटी

टँकरसाठी २.२८ कोटी; महिला स्नानगृहांसाठी १.४२ कोटींचा खर्च



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी सोहळा २०२६ साठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वारकऱ्यांच्या सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे, जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पिण्याचे पाणी, स्नानगृहे तसेच चरणसेवा अशा विविध सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला.

‘आषाढी वारी सोहळा २०२६’साठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, एकूण निधीच्या ३६ टक्के म्हणजेच सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कन्झ्युमेबल्सच्या खरेदीसाठी १० कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. यापैकी सोलापूर जिल्ह्यासाठी ६.७४ कोटी, पुणे जिल्ह्यासाठी १.९१ कोटी आणि सातारा जिल्ह्यासाठी १.३३ कोटी रुपये निश्चित करण्यात आले.

जर्मन हँगरसाठी ८ कोटी

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना निवारा मिळावा यासाठी जर्मन हँगर उभारणीवर ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यासाठी नवी दिल्ली येथील ‘दीपाली डिझाईन्स अँड एक्झिबिट्स’ या कंपनीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. याशिवाय ५८ वॉटरप्रूफ मंडपांसाठी ३.५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, ‘कृष्णा कन्स्ट्रक्शन’, पुणे यांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

चरणसेवेसाठी ७२ लाख

वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा यासाठी चरणसेवेवर ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले. ‘कल्पित कॉर्पोरेशन’कडून प्रत्येकी ११ हजार ९८९ रुपये दराने फूट मसाजर खरेदी करण्यात आले. मुक्कामाच्या ठिकाणी पालखी येण्याच्या एक दिवस आधी ही यंत्रे बसविण्यात आली होती. वारीदरम्यान मशीनमध्ये बिघाड झाल्यास पाच तासांत दुरुस्ती करण्याची अट कंत्राटदारावर घालण्यात आली होती. तसेच ७ ते २५ जुलैदरम्यान पालखी सोहळ्यासोबत आवश्यक वाहने आणि पूर्णवेळ तांत्रिक कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.

महिला स्नानगृहांसाठी १.४२ कोटी

पालखी मार्गावर १०,०१५ फिरत्या महिला स्नानगृहांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी प्रत्यक्ष १ कोटी ४२ लाख ४८ हजार ८४१ रुपये खर्च करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी कापडी आडोसा उभारण्यात आला असून, केवळ महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दर १०० स्नानगृहांमागे एक पाण्याचा टँकर आणि एक जेटिंग मशीन, तसेच २४ तास वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

२२० टँकरमधून पाणीपुरवठा

वारी मार्गावरील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी १६२ खासगी आणि ५८ शासकीय अशा एकूण २२० टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. १५९ फीडिंग पॉईंटवर प्रति टँकर ६ हजार ७०० रुपये दराने शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी २ कोटी २८ लाख रुपयांची निविदा निश्चित करण्यात आली. प्रमुख संतांच्या पालख्यांसोबतही पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते.

वारीतील लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य, निवारा, पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत विविध सुविधा उभारल्या. मात्र, या कोट्यवधींच्या खर्चामुळे सुविधांची गुणवत्ता, प्रत्यक्ष लाभ आणि खर्चाचे औचित्य याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages