२० ऑगस्टला भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सोलापुरात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

२० ऑगस्टला भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सोलापुरात

२० ऑगस्टला भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सोलापुरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते राहणार उपस्थित

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या युवा व महिला मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १३ ऑगस्टदरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि एसआयआर मतदार यादीच्या आढाव्यासंदर्भातही पक्षाची बैठक झाली. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तडवळकर बोलत होत्या.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्यासह भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

तिरंगा यात्रेसह विविध कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा व महिला मोर्चाच्या पुढाकाराने १० ते १३ ऑगस्टदरम्यान तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान नागरिकांनी आपल्या घरांवर कापडी तिरंगा फडकवावा, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

फाळणीच्या वेदनांचे स्मरण म्हणून १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात येणार आहे. यानिमित्त मिरवणूक, छायाचित्र प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नैराश्यातून अंधारेंची बडबड’

उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेवरून भाजप आमदारांनी जोरदार पलटवार केला. सुषमा अंधारे यांची ओळख काय आहे? त्यांच्याकडे कोणते संविधानिक पद आहे? असा सवाल आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या अंधारे आता त्याच भाषेत भाजप नेत्यांवर टीका करीत असल्याचा आरोप कोठे यांनी केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल अंधारे यांनी केलेले वक्तव्य हे नैराश्यातून केलेली बडबड असल्याचे त्यांनी म्हटले.

सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळाल्यामुळे सुषमा अंधारे यांची ‘पोटदुखी’ वाढली असल्याची टीकाही कोठे यांनी केली.

दरम्यान, सुषमा अंधारे वैफल्यातून टीका करीत असून त्यांच्या वक्तव्यांना आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगत या वादावर पूर्णविराम दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages