२०१ रोजंदारी, बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ‘स्थायी’ची मंजुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

२०१ रोजंदारी, बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ‘स्थायी’ची मंजुरी

 २०१ रोजंदारी, बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ‘स्थायी’ची मंजुरी

महासभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव शासनाकडे; महापालिकेवर दरवर्षी ७.२५ कोटींचा अतिरिक्त भार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर महापालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रश्नाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या २०१ रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यातील सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असून, महासभेची मान्यता मिळाल्यानंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कायम सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महापालिका स्थायी समितीची सभा सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉलमधील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झाली. या सभेत एकूण नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली.

१९९५ नंतर तात्पुरत्या नियुक्त्या

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये १९९५ नंतर रोजंदारी आणि बदली पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे आरोग्य, नगरअभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता तसेच उद्यान विभागात मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नियुक्त करण्यात आले.

या कर्मचाऱ्यांची सुरुवातीला २५७ जणांची यादी तयार करण्यात आली होती. त्यातील मृत, सेवानिवृत्त, दीर्घकाळ गैरहजर तसेच न्यायालयीन आदेशानुसार कायम झालेले कर्मचारी वगळल्यानंतर सध्या २०१ कर्मचारी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.

१५६ कर्मचाऱ्यांसाठी पदनिर्मितीची गरज

उपलब्ध कायम पदांचा आढावा घेतल्यानंतर विविध संवर्गांमध्ये प्रवर्गनिहाय ४५ कायम पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी १५ अधिसंख्य आणि १४१ कायमस्वरूपी पदांची निर्मिती करावी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर २०१ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली.

दरम्यान, रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

महापालिकेवर ७.२५ कोटींचा अतिरिक्त भार

२०१ रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना कायम केल्यानंतर त्यांच्या वेतनापोटी महापालिकेवर दरवर्षी ७ कोटी २५ लाख ७७ हजार २४८ रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. प्रस्तावात याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा लाभ मिळणार असला, तरी त्याचा परिणाम महापालिकेच्या वेतनावरील खर्चावर होणार आहे. त्यामुळे आता महासभा आणि त्यानंतर शासन या प्रस्तावाला मंजुरी देते का, याकडे कर्मचाऱ्यांसह महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

प्रारंभ प्रतिष्ठानला जागा देण्याचे निर्देश

जुळे सोलापूर परिसरात २००८ पासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रारंभ बहुउद्देशीय प्रतिष्ठानला सभामंडप उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाचेही स्थायी समितीने अवलोकन केले.

जुळे सोलापूर पोलीस चौकीशेजारील २० बाय २० फूट जागा ९ वर्षे ११ महिन्यांच्या कराराने नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आल्याचे सभापती रंजिता चाकोते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages