विद्यार्थी आंदोलनाचा भडका; झारखंड विधानसभेला घेराव
जेपीएससीच्या माजी अध्यक्षांना अटक; सीआयडीच्या कारवाईने खळबळ
रांची (कटूसत्य वृत्त):- विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या झारखंड विधानसभा घेराव आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे मोर्चा काढत पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. या कारवाईत काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली.
दरम्यान, या प्रकरणात हेमंत सोरेन सरकारने मोठी कारवाई करत झारखंड लोकसेवा आयोगाचे (जेपीएससी) माजी अध्यक्ष एल. ख्यांग्ते यांना अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेली ही २०वी अटक आहे. यापूर्वी उपपरीक्षा नियंत्रकासह १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
एल. ख्यांग्ते यांनी २२ जुलै रोजी जेपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २८ जुलैपासून सीआयडीकडून त्यांची वारंवार चौकशी सुरू होती. रविवारी आयोगाच्या सदस्य अजीता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद यांनीही राजीनामे दिले. राज्यपाल संतोषकुमार गंगवार यांनी हे राजीनामे मंजूर केले आहेत. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेच्या आरोपांप्रकरणी सीआयडीने या तिन्ही सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांची नियुक्ती सप्टेंबर २०२१ मध्ये झाली होती.
ईडीचीही एन्ट्री
स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असतानाच या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) एन्ट्री झाली आहे. झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन (जेएसएससी) सीजीएलसह अन्य भरती परीक्षांमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. सीआयडीने दाखल केलेला एफआयआर आणि इतर तक्रारींची दखल घेत मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत तपास सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आंदोलकांचा पोलिसांशी संघर्ष
विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे जोरदार मोर्चा काढला. पोलिसांनी उभारलेले अनेक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे सोडले आणि लाठीचार्ज केला. काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या व चपला फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो हे रुग्णवाहिकेतून आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, बॅरिकेड्सवर चढून विद्यार्थी घोषणा देताना आणि नाचताना दिसले. काही विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान राष्ट्रगीतही गायले.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून संसदेत कोंडी
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेली संसदेची कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे.
या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतील, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
२० जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेली पोलिसांची कारवाई कठोर आणि अवाजवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही कारवाई गृहमंत्र्यांच्या आदेशावरून झाल्याचा दावा केला होता. गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन देऊन उत्तर द्यावे, या मागणीवर काँग्रेससह विरोधी पक्ष ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले.
No comments:
Post a Comment