नियमित कर्जदारांना २ लाख द्या, २३ जिल्ह्यांत शेतकरी उतरले रस्त्यावर
कृषिमंत्र्यांच्या घरासमोर 'महामुक्काम' आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई (कटूसत्य वृत्त):- नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करावेत, वन, देवस्थान, गायरान, वरकस व घरांच्या तळ जमिनी नावे कराव्यात आदी मागण्यांसाठी (दि. १० ऑगस्ट) राज्यातील २३ जिल्ह्यात किसान सभेच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी 'जेल भरो' आंदोलने केली.
ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार आदी २३ जिल्ह्यांमध्ये आंदोलने करून निवेदने देण्यात आली. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली २० ऑगस्ट रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर बेमुदत राज्यव्यापी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
''नियमित कर्जदारांची केवळ ५० हजारांवर बोळवणूक करण्यात आली. आम्ही नियमित कर्ज भरले म्हणून चूक केली का? आम्हाला शिक्षा का करताहेत? अशी त्यांची भावना आहे. यासाठी आज किसान सभेच्या वतीने राज्यभर आवाज उठवण्यात आला,'' अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
त्याचसोबतच पीक विम्याचे जे ट्रिगर काढून टाकले आहेत. तो मुद्दाही उठवण्यात आला. वन, देवस्थान, गायरान जमिनींचे मुद्देदेखील आज मोठ्या प्रमाणात उचलण्यात आले. या मुद्यांची सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
'...तर जंतर-मंतरवरील आंदोलनाची पुनरावृत्ती होईल'
सरकारने जर याची दखल घेतली नाही तर पुढील १० दिवसांमध्ये प्रचंड मोठी तयारी महाराष्ट्रातील शेतकरी करतील. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर येथील निवासस्थानाकडे आम्ही कूच करणार आहोत. जंतर-मंतरवरील आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याची पूर्ण तयारी आम्ही ठेवली आहे.
नियमित कर्जदारांचा, पीक विमाधारकांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी जे शेतकरी कसतात; त्यांचा प्रश्न घेऊन आम्ही बेमुदत आंदोलनाला बसणार आहोत. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हजारो शेतकरी कृषिमंत्र्यांच्या दारात बसून महामुक्काम आंदोलन करतील. सरकारने आमच्यावर ती वेळ देऊ नये. जर सरकारने ही वेळ आमच्यावर आणली तर जबरदस्त अशा प्रकारचे अभूतपूर्व आंदोलन महाराष्ट्रात होईल असा इशारा आज २१ जिल्ह्यांतून देण्यात आला, असे नवले यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment