मोहोळच्या सुज्ञ नागरिकांचा निर्णय ठाम; ‘मशाल’ चिन्हावर बटन दाबून विजय मिळवून देणार — शिवसेना (UBT)चे जेष्ठ नेते दीपक गायकवाड
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण चुरशीला पोहोचले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. “मोहोळचे सुज्ञ आणि जागरूक नागरिक यंदा ‘मशाल’ चिन्हासमोर बटण दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील,” असा ठाम विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक (मेंबर) गायकवाड यांनी व्यक्त केला.
मोहोळ शहरातील विविध प्रचार मेळावे, संवाद सभा आणि घरदरवाजे भेटीच्या दरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहता गायकवाड यांनी सांगितले की, “मोहोळकरांचा मूड स्पष्ट आहे. खोट्या आश्वासनांवर, पैशांच्या खेळावर आणि धमक्या-हुल्लडबाजीवर या वेळेस मोहोळकरांनी शिक्कामोर्तब न करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला हवे आहे सुटसुटीत प्रशासन, प्रामाणिक कारभार आणि खरा विकास आणि हे ‘मशाल’च करू शकते.”
गायकवाड पुढे म्हणाले, “मशाल म्हणजे प्रकाश, दिशा आणि जागृती. मोहोळला अंधारातून बाहेर काढून शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. नागरिकांची एकच मागणी स्वच्छ प्रशासन आणि जबाबदार नेतृत्व.”
शिवसेना (UBT) च्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठ्या संख्येने युवक, व्यावसायिक आणि महिला वर्ग सहभागी होत आहेत. रस्तोरस्ती जोरदार घोषणा आणि मशाल चिन्हाची उपस्थिती प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहे.
स्थानिक प्रश्नांवरील चर्चा, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि शहरातील पाणीपुरवठा–रस्ते–स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवरील उपाययोजना यामुळे पक्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले, “मोहोळचा मतदार आता जागृत आहे. कोणी कितीही पैसा उडवला, दडपशाही केली किंवा खोटे आश्वासने दिली, तरी यावेळी निर्णय विकासाचा आणि मोहोळच्या स्वाभिमानाचा असेल.”
शहरातील प्रमुख चौकांत सभा, संभाषणे आणि घरगुती बैठका सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अपार आहे. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर ‘मशाल’ चिन्हाकडे झुकणारे वातावरण अधिकच गडद होत चालल्याचे चित्र दिसत आहे.
0 Comments