दबावाला घाबरणार नाही, शेवटपर्यंत लढणार” – उज्वला थिटे यांचा ठाम इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. “अनगर नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही. माझ्या जिवाचं बरं वाईट झालं तरी मी ही निवडणूक लढविणार आहे,” असा ठाम निर्धार अनगर येथील संभाव्य उमेदवार उज्वला थिटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
थिटे म्हणाल्या, “मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि मला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी हा राजकीय कट रचला गेला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून माझा एका माजी आमदाराशी वाद सुरू आहे. त्याबाबत मी माजी आमदार यशवंत माने यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी न्याय दिला नाही. उलट आमदार राजू खरे यांनी माझ्या बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न केला, म्हणून माजी आ. माने यांनी माझ्याविरुद्ध पैशाची ऑफर दिल्याचा खोटा अपप्रचार केला आहे.”
थिटे यांनी स्पष्ट केले की, “मी न्याय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडेही गेले, उपोषण देखील केले, तरीही मला न्याय मिळाला नाही. माझ्याकडे २८ एकर शेती असूनदेखील ती कसता येत नाही, एवढेच नव्हे तर घरदार सोडून परगावी राहावं लागत आहे. तरीही माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.”
“मी कोणत्याही दबावाला, धमकीला किंवा अपप्रचाराला घाबरणार नाही. अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मी अर्ज भरणार आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहे,” असा ठाम निर्धार थिटे यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस उज्वला थिटे यांचा मुलगा जयवंत थिटे उपस्थित होता.

0 Comments