मुंबई (कटूसत्य वृत्त):-
तमिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेले भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत “हे शहर महाराष्ट्राचे नाही”असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईच्या व्यवस्थापनासाठी योग्य लोक बीएमसीमध्ये बसवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अण्णामलाई यांच्या या विधानामुळे मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, मुख्यमंत्र्यांनी अण्णामलाई यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून तिच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक अस्मितेशी खेळ केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
0 Comments