Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदान हक्क बजावा, लोकशाही टिकवा; योगदंड पूजनातून जनजागृती

 मतदान हक्क बजावा, लोकशाही टिकवा; योगदंड पूजनातून जनजागृती





शेटे वाडा फुलांनी सजला; चार दिवस चालणाऱ्या विधींचा श्रीगणेशा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
ऐन सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे औचित्य साधत शनिवारी शेटे वाड्यात पार पडलेल्या योगदंड पूजन सोहळ्यात मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. “मतदानाचा पवित्र हक्क बजावा, लोकशाही टिकवा” असा संदेश देणारे फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
हिरेहब्बू व हब्बू मंडळींच्या उपस्थितीत आरती सोहळा पार पडताच “एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र… सिद्धेश्वर महाराज की जय” या जयघोषाने शेटे वाडा दुमदुमून गेला. शेटे वाडा फुलांनी सजविण्यात आला असून, चार दिवस चालणाऱ्या विधींचा श्रीगणेशा यावेळी झाला.
सकाळी मानकरी शिवानंद कंठीकर हे बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून योगदंड घेऊन शेटे वाड्यात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ सागर हिरेहब्बू यांच्यासह हब्बू मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र–गोवा बार कौन्सिलचे सदस्य तथा मानकरी अॅड. मिलिंद थोबडे व अॅड. रितेश थोबडे यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रारंभी श्री शिवयोगी सिद्धरामांच्या प्रतिमेस व योगदंडास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर हिरेहब्बू व हब्बू मंडळींची पाद्यपूजा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. योगदंडासमोर मशाल दाखवून सिद्धरामाचा जयजयकार करण्यात आला. यानंतर भक्तीमय वातावरणात आरती सोहळा पार पडला.
यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती विजयाताई थोबडे, अॅड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, अॅड. रितेश थोबडे, श्रद्धा थोबडे, पर्णिका रितेश थोबडे, सिद्धेश थोबडे, वैशाली अक्कलवाडे आदी उपस्थित होते. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, राजशेखर शिवदारे, पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यात्रा आणि निवडणूक एकाचवेळी येत असल्याने दोन्ही शांततेत पार पडाव्यात,असे साकडे श्री सिद्धराम महाराजांना घातल्याची भावना अॅड. मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केली. तसेच ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामाच्या यात्रेत योगदंड पूजनाचा मान मिळणे हे आपले भाग्य असून, सोलापुरात सदैव शांतता नांदो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments