शेटे वाड्यातून सुरु होणार वार्षिक यात्रा; नंदीध्वज मिरवणूक आणि शोभेचे दारूकाम
मंगळवारी अक्षता सोहळा, बुधवारी होम विधी तर गुरुवारी शोभेचे दारूकाम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या वार्षिक यात्रेस सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी तैलाभिषेक सोहळ्याने प्रारंभ होत आहे. मंगळवारी (दि. १३ जानेवारी) सम्मती कट्टा परिसरात अक्षतांचा मुख्य सोहळा पार पडणार असून, बुधवारी (दि. १४ जानेवारी) होम प्रदीपन विधी तर गुरुवारी (दि. १५ जानेवारी) शोभेचे दारूकाम होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी, दि. १६ जानेवारी रोजी शेटे वाड्यात कप्पडकळी (नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन) विधीने यात्रेची सांगता होणार आहे. सोमवारी हिरेहब्बू वाड्यापासून मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने ६८ लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी रवाना होणार असून, रात्री उशिरा नंदीध्वज पुन्हा हिरेहब्बू वाड्यात परतणार आहेत. तैलाभिषेक व अक्षता सोहळ्याच्या दोन्ही दिवशी ६८ लिंग प्रदक्षिणा पार पडणार आहे.
पत्रकार परिषदेत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, विश्वनाथ लब्बा, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. आर. एस. पाटील यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी नीलकंठप्पा बमणी, गुरुराज माळगे, पशुपती माशाळ, शिवकुमार पाटील, नितीन उपासे, सुरेश कोरे, मल्लकार्जुन कळके, डॉ. राजेंद्र घुली, विलास कारभारी, मल्लिनाथ मसरे, प्रकाश बिराजदार, प्रा. राजशेखर येळीकर, सोमशंकर देशमुख, भीमाशंकर पटणे, रतन रिक्के आदी उपस्थित होते.
यंदा यात्रेत विशेष आकर्षण म्हणून दि. १५ जानेवारी रोजी शोभेच्या दारूकाम सोहळ्यात ‘ड्रोन लाइट शो’ सादर होणार आहे. सुमारे ३०० ड्रोनच्या सहाय्याने शिवयोगी सिद्धराम महाराजांच्या चरित्रावर आधारित प्रकाशरूप सादरीकरण होणार असून, हा आगळावेगळा कार्यक्रम भाविकांचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वास धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला.
अक्षता सोहळ्याच्या दिवशी नंदीध्वज मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीच्या देशभरातील दीड ते दोनशे कलाकारांकडून रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. तसेच १४ जानेवारी रोजी होम मैदानावर होम विधी पार पडणार असून, सोन्या मारुती ते विजापूर वेस या मार्गावर कला फाउंडेशनच्या वतीने रांगोळी सजावट केली जाणार आहे.
पंच कमिटीच्या वतीने गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी ‘शिवशरणी रुद्रांबिका’ नावाचे मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात येत असून, ‘शिवशरणी बसवांबिका’ महिला वसतिगृहाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती काडादी यांनी दिली.
0 Comments