सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी (मविआ) यावेळी अधिक एक होवून आणि आक्रमक पवित्र्यात मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), माकप व लाल बावटा या घटक पक्षांची मोट बांधण्यात आली आहे.
प्रचाराचा नारळ, जाहीरनामा प्रकाशन आणि संयुक्त कार्यक्रमांमधून आघाडीतील एकतेचे ठळक दर्शन घडले आहे. भाजपविरोध हा सर्व घटक पक्षांना एकत्र आणणारा प्रमुख समान धागा असला, तरी रागलोभ दूर सारून एकत्र आलो आहोत ही भावना आघाडीतील नेते व कार्यकर्ते एकमेकांना सातत्याने अधोरेखित करत आहेत.
महाविकास आघाडीने या निवडणुकीत भाजपच्या तथाकथित ‘ट्रिपल इंजिन सरकार’ संकल्पनेवर थेट हल्ला चढवला आहे. महापालिकेतील भाजपची पाच वर्षांची सत्ता आणि त्यानंतरचा तीन वर्षांचा प्रशासक काळ या काळातील सावळागोंधळ, रखडलेली विकासकामे, वाढलेली करबोजा आणि मूलभूत सुविधांचा अभाव मतदारांसमोर ठामपणे मांडण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.
“सत्ता असूनही शहराचा अपेक्षित विकास झाला नाही आणि प्रशासक काळात तर लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांचे प्रश्न अधिकच दुर्लक्षित झाले,” हा मुद्दा आघाडी प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे.
या निवडणुकीमुळे खासदार प्रणिती शिंदे यांना पुन्हा एकदा थेट मतदारांशी संवाद साधण्याची मोठी संधी मिळाली आहे. प्रभागनिहाय दौरे, कॉर्नर बैठका आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचारातून त्या आघाडीचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. पालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या अपयशानंतर ही निवडणूक आघाडीने अधिक गांभीर्याने घेतल्याचे संकेत त्यांच्या प्रचारातून मिळत आहेत.
ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित नसून, महाविकास आघाडीच्या भवितव्याचीही कसोटी मानली जात आहे. घटक पक्षांतील समन्वय, स्थानिक पातळीवरील एकजूट आणि मतदारांचा प्रतिसाद या साऱ्यांवर आघाडीचा पुढील राजकीय प्रवास अवलंबून आहे.
पालिका निवडणुकीतील अपयशातून धडा घेत महापालिका निवडणुकीत अधिक नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरलेली महाविकास आघाडी मतदारांना कितपत विश्वासात घेऊ शकते, आणि भाजपविरोधी एकजूट प्रत्यक्ष मतदानात किती प्रभावी ठरते, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
0 Comments