Hot Posts

6/recent/ticker-posts

रोज पाणीपुरवठा, नाईट लँडिंग व आयटी पार्क—मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

रोज पाणीपुरवठा, नाईट लँडिंग व आयटी पार्क—मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा, होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, यंत्रमाग उद्योगासाठी इचलकरंजी पॅटर्नची अंमलबजावणी तसेच आगामी काळात आधुनिक आयटी पार्कची उभारणी पूर्ण करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ह. दे. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, माजी आमदार राजेंद्र राऊत, दिलीप माने, नरसिंग मॅगजी, प्रशांत परिचारक, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, शहाजी पवार, मनीष देशमुख आदी उपस्थित होते.

“एकदा भक्तलिंग हर्र हर्र बोला हर्र” असा जयघोष करत आणि ग्रामदैवत सिद्धेश्वरामेश्वर यांना नमन करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात केली. सोलापूर हे संघर्षशील लोकांचे शहर असून डाळिंबाची राजधानी म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. या ओळखीबरोबरच सोलापूरला आधुनिक शहराची नवी ओळख मिळवून द्यायची आहे, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शहरात विमानतळ सुरू करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून वंदे भारत रेल्वेही सुरू झाली आहे. काही लोक म्हणत होते की सोलापुरात विमानसेवा सुरू होणार नाही; मात्र आम्ही ती सुरू करून दाखवली. आता या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नाव न घेता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेचा त्यांनी समाचार घेतल्याची चर्चा सभास्थळी होती.

रोज पाणीपुरवठा झाला नाही तर आमदारकीचा त्याग – देवेंद्र कोठे

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. सोलापूर शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर मी पुन्हा आमदारकीसाठी मत मागणार नाही आणि प्रसंगी आमदारकीचा त्याग करेन, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणारा महामार्ग

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे. नुकताच नाशिक–सोलापूर–अक्कलकोट हा नवा महामार्ग मंजूर करण्यात आला आहे. हा महामार्ग सोलापूरला देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराशी जोडणार असून त्यामुळे व्यापार व उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.

सोलापूर पर्यटनाचे इंजिन ठरणार

पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूर या तीर्थक्षेत्रांचा पर्यटन सर्किट तयार करण्यात आला असून या सर्किटच्या मध्यभागी असलेले सोलापूर पर्यटनाचे ‘इंजिन’ म्हणून काम करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सोलापूरमधील तरुण रोजगारासाठी बाहेर जात असल्याने येथे आयटी पार्क सुरू करण्याची मागणी होती. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच आधुनिक आयटी पार्क उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सभेतील क्षणचित्रे

भाजपच्या या सभेला सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आली होती. सभेत मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. भाजपचे सर्व आमदार व माजी आमदार एकत्रितपणे व्यासपीठावर उपस्थित होते.

बाराबंदी वेशात आगमन

सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान समितीचे प्रमुख धर्मराज काडादी व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. बाराबंदीच्या वेशात सभास्थळी आगमन करत महापालिका निवडणुकीतील विजयासाठी ग्रामदैवताकडे आशीर्वाद मागितल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर भाजपचाच होणार – पालकमंत्री गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, कुंभारी एमआयडीसीचे विस्तारीकरण उद्योगविकासासाठी आवश्यक आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योजकांना दिलेल्या सवलतींच्या धर्तीवर सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगालाही मदत दिली जाईल. सर्व सोलापूरकर भाजपच्या पाठीशी असून आगामी महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments