आपलं मत कुणाला? अजित दादांच्या घड्याळाला!
प्रभाग ४ मधील मतदारांचा कल स्पष्ट – संतोष पवार यांचा विश्वास
सुशील बंदपट्टे यांचा ‘होम टू होम’ प्रचार; नागरिकांशी थेट संवादातून प्रश्नांवर ग्वाही
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रचाराला वेग आला असून, “आपलं मत कुणाला? अजित दादांच्या घड्याळाला!” असा मतप्रवाह प्रभागातील मतदारांमध्ये दिसून येत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधील युतीचे उमेदवार सीए सुशील बंदपट्टे यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर देत नागरिकांशी थेट संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यू बुधवार पेठ परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून न्यू बुधवार पेठ, मराठा वस्ती, जम्मा चाळ, श्रीराम नगर आदी भागांमध्ये त्यांचा सघन प्रचार सुरू आहे.
या भेटीदरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाईनचे प्रश्न, घंटागाडी वेळेवर न येणे, परिसरातील अस्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. काही भागांत तर विद्यमान नगरसेवक नागरिकांपर्यंत पोहोचलेच नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून या समस्या कायम असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याची भावना मतदारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पॅनलच्या वतीने सर्व प्रश्नांवर ठोस आणि प्रभावी उपाययोजना करून त्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची ग्वाही देण्यात आल्याचे बंदपट्टे यांनी स्पष्ट केले. ड्रेनेज लाईन दुरुस्ती, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
‘होम टू होम’ प्रचारामुळे मतदारांशी थेट संवाद साधता येत असून, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यास मोठी मदत होत असल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले. या पद्धतीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार अ. कविता चंदनशिवे, ब. सीए सुशील बंदपट्टे, क. सारिकाताई फुटाणे, ड. विश्वनाथ बिडवे यांच्यासह कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत मतदारांशी संवाद साधला.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ‘घड्याळा’च्या बाजूने मतदारांचा कल वाढत असून, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणूक प्रचाराला निर्णायक वळण मिळत असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
batmi-2
कस्तुरबा भाजी मंडईच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
व्यापाऱ्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याचे आश्वासन
प्रचारात नव्या मुद्द्यांवर चर्चा; प्रभाग ४ मधील नागरिकांनी उपस्थित केले प्रश्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– सोलापूर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्वात जुन्या कस्तुरबा भाजी मंडईची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, येथे भाजी विक्रेते तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा मंडईची तातडीने दुरुस्ती करणे, तसेच बाजारपेठेत येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासन प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सुशील बंदपट्टे यांनी दिले.
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सुशील बंदपट्टे यांनी वडार गल्ली, स्लीपर कॉलनी, नीला नगर, गौरा नगर, नागणे देशमुख अपार्टमेंट आणि सम्राट चौक या परिसरातून पदयात्रा काढली. या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी कविता आनंद चंदनशिवे, सारिका फुटाणे, विश्वनाथ बिडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी कस्तुरबा भाजी मंडईतील गाळ्यांची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभाव तसेच पावसाळ्यात व उन्हाळ्यात व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत प्रश्न उपस्थित केले. शहरातील सर्वात जुनी आणि महत्त्वाची असलेली ही भाजी मंडई दुर्लक्षित असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
यावर प्रतिक्रिया देताना सुशील बंदपट्टे म्हणाले, “प्रभाग क्रमांक ४ हा केवळ लोकवस्तीचा भाग नसून, तो एक महत्त्वाचा व्यापारी परिसरदेखील आहे. त्यामुळे या भागात मुंबईच्या धर्तीवर व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज निवारा केंद्र, स्वच्छतागृहे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कस्तुरबा भाजी मंडईसाठी स्वतंत्र विशेष निधी आणून तेथे व्यवस्थित ओटे, भाजी धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल.”
याचबरोबर वडार गल्ली व परिसरातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांवरही सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी मांडलेल्या सूचनांच्या आधारे विकासकामांचे नियोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
एकूणच, प्रचाराच्या निमित्ताने झालेल्या या पदयात्रेमुळे प्रभाग ४ मधील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, विशेषतः व्यापारी व भाजी विक्रेत्यांशी संबंधित समस्या ऐरणीवर आल्या असून, त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
.png)
.png)
0 Comments