स्वीकृत नगरसेवक पदासाठी अभयसिंह गायकवाड यांचे नाव आघाडीवर
अनगरकर पाटील शब्दाचे पक्के; त्यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असतानाच, आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. नगर परिषदेमधील पक्षीय बलाबल पाहता भाजपकडे ११ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट)कडे नगराध्यक्षांसह ८ नगरसेवक, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे १ नगरसेवक आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्य कोण होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील अनगरकर तसेच लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते अभयसिंह गायकवाड यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून भाजपकडून अभयसिंह गायकवाड हे आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे आणि निष्ठावंत, सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, या भूमिकेतून त्यांनी गव्हाणे यांच्या महिलेला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे आग्रह धरला. दरम्यान, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या भोसले यांच्या पत्नीला तिकीट मिळावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले.
तिकीट वाटपावेळी दिलेला शब्द महत्त्वाचा. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शैलेश गरड व इतर नेत्यांनी अभयसिंह गायकवाड यांना एक वेळ थांबण्याची विनंती केली. त्यानंतर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार राजन पाटील अनगरकर व बाळराजे पाटील यांच्याकडे चर्चा झाली. यावेळी “तुम्हाला स्वीकृत सदस्य नक्की करू” असा शब्द अभयसिंह गायकवाड यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. राजन पाटील हे शब्दांचे पक्के नेते म्हणून ओळखले जात असल्याने, अभयसिंह गायकवाड यांच्या नावाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी ‘लॉटरी लागणार’ अशी जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा
प्रभाग क्रमांक १ हा आजवर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तालुक्यात शिवसेनेचा उगम याच प्रभागातून झाल्याचे सांगितले जाते. अशा या बालेकिल्ल्यात अभयसिंह गायकवाड यांनी अत्यंत कौतुकास्पद संघटनात्मक कामगिरी करत भाजपचे उमेदवार सतीश काळे यांना निवडून आणले, तर भाग्यश्री भोसले यांचा फक्त तीन मतांनी पराभव झाला. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांना लीड मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
युवा संघटक म्हणून गायकवाड यांची ओळख असून, राजन पाटील अनगरकर व बाळराजे पाटील यांचे विश्वासू, पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
अभयसिंह गायकवाड हे सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष दत्तात्रय आबा गायकवाड यांचे पणतू, तर काँग्रेसचे जिल्हास्तरीय प्रमुख नेते केशवराव गायकवाड यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांच्या घराण्यात राजकीय वारसा मोठा असून, त्यांनी तो वारसा भाजपमध्ये प्रभावीपणे पुढे नेल्याचे कार्यकर्ते सांगतात.
यापूर्वी त्यांनी माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षासाठी व संघटनेसाठी जागृत व दक्ष राहून काम केले आहे.
आक्रमकतेला तात्विक प्रत्युत्तर देणारे, प्रशासन व पक्षश्रेष्ठी यांच्यात विकासात्मक समन्वय साधणारे, तसेच सर्व नगरसेवकांमध्ये वैचारिक एकसंघपणा राखणारे स्वीकृत नगरसेवक भाजपला आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ गोरे, ज्येष्ठ नेते राजन पाटील अनगरकर, भाजप नेते आ. सचिनदादा कल्याणशेट्टी व जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण हे स्वीकृत सदस्य निवडीबाबत काय भूमिका घेतात आणि कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
.png)
0 Comments