अकोले मंद्रूपच्या हुरडा पार्टीत सहभाग; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘एक गाव – एक उत्पादन’ संकल्पनेतून अकोले मंद्रूपची वेगळी ओळख
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महापालिका निवडणूक जोरात सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुभाष देशमुख सध्या प्रचारात कुठेही दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपने महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा न करता मनमानी पद्धतीने उमेदवार निश्चित केल्यामुळे आमदार देशमुख नाराज असल्याची चर्चा असून, त्याचा परिणाम त्यांच्या प्रचारापासून अलिप्त राहण्यात दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
अशा राजकीय पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांची अकोले मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे पार पडलेल्या हुरडा पार्टीत उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. “निवडणूक सुरू असताना प्रचारापेक्षा हुरडा पार्टीत आमदार कसे काय?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
अकोले मंद्रूपची ‘हुरड्यासाठी’ वेगळी ओळख
दरम्यान, राजकारणापलीकडे पाहता अकोले मंद्रूप गावाने ‘एक गाव – एक उत्पादन’ या संकल्पनेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीपासून तयार होणारा हुरडा हा अकोले मंद्रूपचा खास वैशिष्ट्यपूर्ण उत्पादक ठरत आहे.
येथील अनेक शेतकरी हुरडा उत्पादनात सक्रिय असून, कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून पर्यटकांना नैसर्गिक व चविष्ट हुरड्याचा आस्वाद देत आहेत. शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नवाढीचा नवा मार्ग खुला होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
हुरडा पार्टी व स्नेहसंवाद मेळावा उत्साहात
या पार्श्वभूमीवर सरपंच रमेशअण्णा आसबे यांच्या वतीने आयोजित हुरडा पार्टी व स्नेहसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावत हुरड्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत शेती, कृषीपूरक उद्योग आणि ग्रामीण विकासाबाबत चर्चा केली.
तरुणांनी उद्योजक व्हावे – आत्मनिर्भरतेचा संदेश
कार्यक्रमादरम्यान तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे, असा संदेश देण्यात आला. याच भावनेतून अकोले मंद्रूप येथील नवउद्योजक मन्मथ पाटील यांनी नोकरीऐवजी शेतकऱ्यांसाठी ‘रसवंती – रसगाडा’ सुरू करून आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राजकीय संकेत की सामाजिक सहभाग?
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आमदार सुभाष देशमुख यांची प्रचारापासून अलिप्त भूमिका आणि सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थिती यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. ही नाराजीचा संदेश आहे की केवळ सामाजिक सहभाग, याचे उत्तर येत्या काळात त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल, अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे.


0 Comments