Hot Posts

6/recent/ticker-posts

झेड.पी. अध्यक्षपद देऊन जयकुमार गोरे मोहोळचे पालकत्व स्वीकारतील..?

 झेड.पी. अध्यक्षपद देऊन जयकुमार गोरे मोहोळचे पालकत्व स्वीकारतील..? 





▪️कामती गटाच्या विमलताई खताळ यांना संधी मिळण्याची शक्यता
▪️माजी आमदार राजन पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष


कुरुल (कटूसत्य वृत्त):- नुकताच लोकेनेते परिवाराने भाजपा मध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर ग्रामीण भागातील ही त्यांची कमळ चिन्हावरील  पहिलीच निवडणूक. या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपाच्या माध्यमातून वर्चस्व सिद्ध केले. भाजप हा सत्तेतला पक्ष जरी असला तरी मोहोळ विधानसभा आमदार हा विरोधी पक्षाचा अर्थात अनगरकर विरोधक आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्याच्या भरीव विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हाच पर्याय सध्यातरी असून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मोहोळच्या वाट्याला देऊन मोहोळचे 'पालकत्व' पालकमंत्री स्वीकारतील काय...? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. यदाकदाचित संधी मिळाली तर तालुक्याचे भाग्यविधाते राजन पाटील कुणाला संधी देणार...? याकडे देखील लक्ष लागले असून यासाठी कामती गटाच्या सदस्या विमलताई खताळ यांचे नाव यानिमित्ताने चर्चेत आले आहे.


खरंतर या अगोदरच्या आणि सध्याच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद नसल्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी इतर मंत्र्याच्या खांद्यावर टाकावी लागत आहे. अर्थात यामुळे वेगवेगळे पालकमंत्री नेहमीच चर्चेत राहिले. मात्र सध्याच्या महायुती सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या सध्याच्या पालकमंत्र्यांची क्रेझ झाली असून सोलापूर जिल्ह्यावर सर्वाधिक प्रेम करणारा पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची ओळख तयार झाली आहे. एवढंच काय..? पण पक्षाच्या दृष्टीने देखील त्यांनी चांगलीच मशागत केली असून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकीत देखील त्यांचा करिष्मा दिसून आला आहे.


दरम्यान काल पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ३८ सदस्य निवडून आणण्यात पालकमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता काही दिवसातच अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच तालुक्यांकडून जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओबीसी सर्वसाधारण आहे. मोहोळ तालुक्याला आजतागायत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कधीच मिळाले नाही. त्यामुळे सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार का..? याकडे लक्ष लागले आहे.


▪️ चौकट 1

धनगर समाजाची वोट बँक 
- मोहोळ तालुक्यात धनगर समाजाची मोठी वोटबँक आहे. समाजाला नेहमीच न्याय देण्याची भूमिका माजी आमदार राजन पाटील यांनी घेतली आहे. कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या चार पैकी दोन जि.प. सदस्य धनगर समाजाचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष साठी धनगर समाजाचे नाव प्रामुख्याने वरच्या स्थानी आहे. त्यामुळे समाजाचा विचार करता कामती गटातून निवडून आलेल्या विमलताई खताळ यांना संधी मिळणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे...?


चौकट 2

 अनगरकरांशी निष्ठा व पालकमंत्र्यांशी स्नेहपूर्ण संबंध 
- स्व. तानाजीराजे खताळ व अनगरकर पाटील परिवाराचा अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. काही काळ वगळता खताळ परिवार नेहमीच निष्ठेने काम करत राहिले आहे. शिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांच्याशी जय शंकर परिवाराचे स्नेहपूर्ण व आपुलकीचे संबंध आहेत. त्यामुळे अनगरकरांनी व पालकमंत्र्यांनी खटाळ यांच्यावर विश्वास टाकल्यास ते नक्कीच विश्वासात पात्र राहून काम करतील असे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहेत. 



▪️ फोटो : जयकुमार गोरे,राजन पाटील व विमलताई खताळ
Reactions

Post a Comment

0 Comments