Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या विकासासाठी झटणार, पण वैयक्तिक टीका सहन नाही : रमेश कदम

 मोहोळच्या विकासासाठी झटणार, पण वैयक्तिक टीका सहन नाही : रमेश कदम




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या विकासासाठी मी नेहमीच काम केले आहे. भाषणबाजी करून लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. आमदार निधीतून तसेच स्वखर्चातून शहराच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, त्या गुन्ह्यातून शिक्षाही झाली, पण लोकांसाठी काम करण्याची धडपड थांबवली नाही, असे सांगत माजी आमदार **रमेश कदम** यांनी विरोधकांना इशारा दिला की, *“कोणतीही व्यक्तिगत टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.”*

मोहोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष कार्यालयात माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, *“नगरपरिषदेची ही निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार यांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नगरपरिषदेवर फडकवणार आहोत. विरोधकांनी वैयक्तिक टीका करण्याऐवजी त्यांनी काय विकास केला हे जनतेसमोर सांगावे. लोकशाहीचा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरा व्हावा, हे सर्व पक्षांनी लक्षात घ्यावे.”

कदम पुढे म्हणाले की, *“मोहोळ शहरातील बहुजन समाजाचा विचार करता अल्पसंख्याक समाजाला नेतृत्व मिळत नाही. या समाजाला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष उमेदवार देणार आहे. पण काही स्थानिक नेते धमक्या देत आहेत, दडपशाहीचं राजकारण करत आहेत. हे प्रकार थांबवावेत. अन्यथा माझा जन्म सोलापूर जिल्ह्यात असला तरी संस्कार मुंबईतील झोपडपट्टीतील आहेत, हे लक्षात ठेवा. निवडणूक गुंडगिरी, दडपशाही किंवा खोट्या प्रचारावर नव्हे, तर विकासावर व्हायला हवी,” असा इशारा त्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनय पाटील, विधानसभा संघटक रणजित चवरे, सिकंदर धोत्रे, राजाभाऊ आष्टूळ, नागेश खिलारे, सुधीर खंदारे, सचिन भिसे, सतीश कांबळे ,सुवर्णा कांबळे, नंदा गोरे, लतिका कांबळे, मुक्ता खंदारे, कामिनी चोरमले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

🟪 **माजी आमदार रमेश कदम यांचा इशारा**

“विरोधकांनी व्यक्तिगत टीका केली, तर जशास तसे उत्तर देण्यात येईल.”

🟪 **सर्वसामान्य महिला होणार नगराध्यक्ष**

मोहोळ नगरपरिषदेला पहिल्यांदाच अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सर्वसामान्य अनुसूचित जातीची महिला उमेदवार उभी राहणार आहे.
माजी आमदार रमेश कदम म्हणाले, *“ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. विधानसभा, विधान परिषद, लोकसभेप्रमाणे मोठ्या नेत्यांनी या निवडणुकीत अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सिद्धी कदम या निवडणुकीत उभ्या राहणार नाहीत. सर्वसामान्य अनुसूचित जातीची महिला नगराध्यक्ष होईल.”

Reactions

Post a Comment

0 Comments