चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंकोली येथे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात
535 नागरिकांची नेत्र तपासणी; 310 जणांना मोफत चष्मे, 60 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
पेनूर (कटूसत्य वृत्त) :- पेनूर ग्रामपंचायत सदस्य रामदास भाई चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंकोली येथे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापूर येथील सुप्रसिद्ध शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रविकारांची वेळेवर तपासणी व उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण 535 नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 310 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर 60 गरजू व मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया सोलापूर येथील शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य मा. रामदास भाई चवरे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून स्वीकारली असून, भविष्यातही आरोग्यविषयक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील.
यावेळी माजी सरपंच काकासाहेब पवार, किशोर बप्पा क्षीरसागर, माऊली आबा भगरे, शिवराज पाटील, प्रशांत बचूटे, पांडुरंग येळवे, सज्जन घाडगे गुरुजी, सचिन पाटील, चेअरमन विजयसिंह पवार, सागर जगताप, पोलीस पाटील बापू गोडसे, बंडू पवार, नानासाहेब पवार, महादेव पवार, बालाजी मगर, आबा पवार, विश्वास डोंगरे, सुरज चव्हाण, सज्जन लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने तपासणी केली. रुग्णांची नोंदणी, तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचाराची प्रक्रिया शिस्तबद्धरीत्या पार पडली. स्वयंसेवकांनी नागरिकांना आवश्यक ती मदत केल्यामुळे शिबिर सुरळीतपणे पार पडले.
ग्रामीण व वयोवृद्ध नागरिकांमध्ये नेत्रविकारांचे प्रमाण वाढत असताना, अशा मोफत शिबिरांमुळे वेळेवर निदान व उपचार शक्य होत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्मे व शस्त्रक्रियेचा लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी रामदास भाई चवरे तसेच शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले.
.png)
0 Comments