जेम्स लेन प्रकरणात सत्याचा विजय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 8, 2026

जेम्स लेन प्रकरणात सत्याचा विजय

 जेम्स लेन प्रकरणात सत्याचा विजय





छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातोश्री यांच्या सन्मानासाठी लढ्याला २० वर्षांनंतर न्याय – मनोज आखरे

टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त) :- छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह, बदनामीकारक व विकृत स्वरूपाचे लिखाण करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणात अखेर सत्याचा विजय झाला आहे. तब्बल वीस वर्षे चाललेल्या संघर्षानंतर इतिहासाच्या सन्मानासाठी लढणाऱ्या शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेडच्या लढ्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.

या प्रकरणात लंडन येथील नामांकित ऑक्सफर्ड विद्यापीठाने संबंधित लिखाणाबाबत खेद व्यक्त करत देशातील अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्रामार्फत जाहीर माफी मागण्यास तयार असल्याची लेखी कबुली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सादर केली आहे. हा निर्णय केवळ एका खटल्यापुरता मर्यादित नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाचा विजय असल्याचे मनोज आखरे यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातोश्री यांच्या चारित्र्यावर अन्यायकारक, विकृत आरोप करणाऱ्या या लिखाणाविरोधात सर्वप्रथम ठोस व संघटित आवाज संभाजी ब्रिगेडने उठवला होता. अन्यायाविरोधात उभे राहत या संघटनेने संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात संभाजी ब्रिगेडच्या ७२ कार्यकर्त्यांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, दंगल, ऐतिहासिक दस्तऐवज नष्ट करणे आणि दहशत निर्माण करणे यांसारखी गंभीर कलमे दाखल करण्यात आली होती. तब्बल १२ वर्षे हे सर्व कार्यकर्ते पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या खटल्यात अडकून होते.

या खटल्यात पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी ७२ मावळ्यांच्या वतीने प्रभावी, निर्भीड आणि सखोल कायदेशीर लढा उभा केला. अखेर न्यायालयाने सर्व ७२ आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असून, सत्य आणि न्याय कधीही पराभूत होत नाही, याची प्रचिती देणारा असल्याचे आखरे यांनी नमूद केले.

संभाजी ब्रिगेडच्या या संघर्षामुळे इतिहासाची विकृती रोखली गेली असून, भविष्यात राष्ट्रपुरुषांविरोधातील बदनामीला ठोस कायदेशीर उत्तर देता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

चौकट

आजचा दिवस इतिहास, स्वाभिमान आणि न्याय यांचा संगम ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातोश्री यांच्या चारित्र्यावर झालेल्या अन्यायकारक आरोपांना तसेच संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे, तमाम शिवप्रेमी आणि एका मातेच्या स्वाभिमानाला ठोस उत्तर मिळाले आहे.
— सचिन जगताप, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages