Hot Posts

6/recent/ticker-posts

मनपा निवडणुकीचा ‘रात्रीस खेळ चाले’; रात्री ११.३० वाजता शपथपत्रे अपलोड

 मनपा निवडणुकीचा ‘रात्रीस खेळ चाले’; रात्री ११.३० वाजता शपथपत्रे अपलोड

सात दिवसांनंतर उमेदवारांची माहिती जाहीर; मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन झाल्याचा आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे प्रचार शिगेला पोहोचलेला असताना, दुसरीकडे उमेदवारांच्या शपथपत्रांबाबत प्रशासनाने दाखविलेल्या दिरंगाईमुळे वाद निर्माण झाला आहे. महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय ५६४ उमेदवारांची शपथपत्रे तब्बल सात दिवसांनंतर, तीही शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता, महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आली. या प्रकारामुळे मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन झाले, अशी तीव्र टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीकेनंतर हालचाल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी रोजी संपल्यानंतरही उमेदवारांची शपथपत्रे ऑनलाइन उपलब्ध न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर टीका केल्यानंतरच शुक्रवारी रात्री उशिरा ही शपथपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याचे चित्र आहे.
ऑफलाईन प्रक्रियेचा फटका मतदारांना
महापालिकेच्या मागील निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन होती. मात्र यंदा राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन प्रक्रिया राबविली, ज्याचा थेट फटका मतदारांना बसल्याचे दिसून येते. अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. आयोगाकडून उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात आले नाहीत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २ जानेवारी होता. त्यानंतर ३ जानेवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून शपथपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली. गुरुवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे शपथपत्रांच्या पीडीएफ प्रती सुपूर्द केल्या. त्यानंतर महापालिकेच्या संगणक विभागाने दुपारनंतर माहिती अपलोड करण्यास सुरुवात केली, मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत रखडली.
निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त
निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त असल्याने तेथे लावलेली माहिती व शपथपत्रे पाहणे सामान्य मतदारांसाठी जवळपास अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत ऑनलाइन माहिती उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असताना प्रशासनाकडून झालेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा थेट आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सरोजनी तमशेट्टी म्हणाल्या,
“मतदारांनी उमेदवारांची माहिती पाहून निर्णय घ्यावा, हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. ऑफलाईन प्रक्रिया राबविताना मतदारांसाठी सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. मात्र येथे मतदारांच्या अधिकारांचे हनन झाले आहे. या अनुभवातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सुधारणा व्हायला हव्यात.”
शपथपत्रे का महत्त्वाची?
उमेदवारांच्या शपथपत्रांमध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील, तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती असते. याच माहितीच्या आधारे अनेक मतदार कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे याचा निर्णय घेतात. त्यामुळे शपथपत्रे वेळेत जाहीर होणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
शपथपत्रे रात्री उशिरा अपलोड केल्याने मतदारांना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांची सविस्तर माहिती अभ्यासण्यास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या ऑफलाईन कारभारावर आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय व सामाजिक स्तरावर उमटण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments