Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे

 जिजाऊ जन्मोत्सव सोहळा १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे

मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजन; जिजाऊ सृष्टी विकासासाठी सहकार्याचे आवाहन
सिंदखेडराजा / बुलढाणा (कटूसत्य वृत्त) :– तमाम मराठा-बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ‘जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ दिनांक १२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील जिजाऊ सृष्टी येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा मराठा सेवा संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या जिजाऊ सृष्टीवर सध्या नवनवीन प्रकल्प वेगाने साकारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, समाजबांधवांच्या सहकार्यामुळे हे कार्य प्रगतीपथावर असल्याचे मराठा सेवा संघाने स्पष्ट केले आहे.
समाजबांधवांना सहभागाचे आवाहन
मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, “जिजाऊ सृष्टी हे केवळ स्मारक नसून विचारांचे, संस्कारांचे आणि प्रेरणेचे केंद्र आहे. हे कार्य अविरत सुरू राहावे, यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजबांधवांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे.”
यासाठी नागरिकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून १,००० रुपये, २,००० रुपये किंवा इच्छेनुसार देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिलेले हे दान जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी अनमोल ठरणार असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
सामाजिक एकात्मतेचा सोहळा
जिजाऊ जन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून तो समाजाला दिशा देणारा, स्वाभिमान जागवणारा आणि शिव-जिजाऊंच्या विचारांना उजाळा देणारा सोहळा असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने मराठा-बहुजन समाजबांधव सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने सर्व नागरिकांना “जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक सदिच्छा” देण्यात आल्या असून,
“तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय!”
या घोषवाक्याने वातावरण भारावून जाणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments